Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जिल्ह्याच्या विकासात माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण.! : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे. ; सिंधुनगरीत पत्रकार दिन व जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण संपन्न.

सिंधुदुर्ग : जनतेला जागृत करणे, त्यांची निर्णयक्षमता वाढविणे यात पत्रकारिता व प्रसार माध्यमांचे महत्वपूर्ण स्थान आहे. शासन आणि पत्रकार यांच्यामध्ये संवादाची भूमिका राहिली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. व्यक्तिगत द्वेष न ठेवता पत्रकारांनी लिखाण करावे. जिल्ह्याच्या विकासात माध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन येथे मराठी पत्रकार दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितेश राणे बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माधव भंडारी तसेच आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिलकुमार सर्वगोड, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा सचिव बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, तालुकाध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. यावेळी रमेश जोगळे यांना ज्येष्ठ पत्रकार, वैभव साळसकर, दत्तप्रसाद वालावलकर, कृष्णा ढोलम, सचिन लळीत, भरत सातोसकर, हरिश्चंद्र पवार, काशीराम गायकवाड, मारुती कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले की, समाजाच्या विकासात प्रसार माध्यमांची भूमिका अनन्यसाधारण आहे. राजकीय व्यक्ती आणि पत्रकार यांची संवादाची भूमिका राहिली पाहिजे. अन्यथा गैरसमज निर्माण होवून जिल्ह्याचे नुकसान होईल. यापुढे जिल्ह्याच्या विकासाला तारक ठरणारा कोणताही प्रकल्प मागे जाणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील एकाही तरुण तरुणीला नोकरीसाठी जिल्हा सोडण्याची वेळ येणार नाही, याची ग्वाही देतो असेही ते म्हणाले.

आमदार निलेश राणे म्हणाले, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते शोधण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी शोध पत्रकारिता करावी. व्यक्तीला महत्त्व न देता विकासाला प्राधान्य देणारे लिखाण करावे. अन्य जिल्ह्यांतील पत्रकार आपल्या भागाला महत्त्व देणारे, विकास साधणारे लिखाण करतात. त्याचे अवलोकन करून लिखाण करावे, असे आवाहन यावेळी आमदार निलेश राणे यांनी केले.

माधव भंडारी म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या २० व्या वर्षी मराठी आणि इंग्रजी मधून दैनिक सुरू केले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा वैचारिक पाया रचला होता. त्यांनीच जनतेच्या मनात पारतंत्र्याविरोधात भावना निर्माण केली. त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील तरुणांनी पुढे यावे. त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रबंध प्रसिद्ध करू, असे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना माधव भंडारी यांनी सांगितले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles