मुंबई : महिला आणि बालकल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण संस्थेला २०२४ -२०२५ मधील भारतातील सर्वोत्कृष्ट संस्था या पुरस्काराने आज मुंबईच्या हॉटेल रेडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलमध्ये सन्मानित करण्यात आले.
भारत सीएसआर अवॉर्ड २०२५ या कार्यक्रमात कोकण संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ब्रेनलिटिक्स या कंपनीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कोकण संस्थेला वेगवेगळ्या विभागात नामांकन मिळाले होते त्यातील महिला व बालक या क्षेत्रात करत असलेल्या कामाबद्दल संस्थेची निवड करण्यात आली. कोकण संस्था गेली १३ वर्षे महिलांच्या आणि मुलांच्या प्रश्नावर काम करत असून रायगड जिल्हा बालविवाह मुक्त व्हावा यासाठी एक्सेस टू जस्टीस या संस्थेच्या बरोबर काम करत आहे तसेच संस्था देशपातळीवर अनेक प्रोजेक्ट चालवत असून ११ लाखापेक्षा जास्त गरजू लाभार्थीना संस्थेच्या माध्यमातून मदत झाली आहे त्याचबरोबर संस्था ४३५ मुलांची सक्षम प्रोजेक्ट अंतर्गत संपूर्ण जबाबदारी घेते. रस्त्यावरील मुलांसाठी गल्ली स्कुल आणि आदिवासी पाड्यातील मुलांसाठी युवा किरण अशा सर्वच प्रोजेक्टची दखल या निमित्ताने घेतली गेल्याचे मत दयानंद कुबल यांनी यावेळी बोलून दाखवले.
या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. भारत सीएसआर आणि सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्ह आणि अवॉर्ड्स हा भारतामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्थांना शोधून त्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम आहे.
पुरस्कार स्वीकारताना संस्थाध्यक्ष दयानंद कुबल आणि प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे


