कणकवली : तालुक्यातील कळसुली, वरवडे, कनेडी, नांदगाव, कासार्डे, खारेपाटण व फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रातील 84 आशांच्या उपस्थितीत कणकवली तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन बुद्धविहार कणकवली येथे उत्साहात पार पडले.
अधिवेशनात सुरुवातीला जिल्हा सचिव कॉम्रेड विजयाराणी पाटील यांनी गेल्या तीन वर्षातील संघटनात्मक कामकाजाचा अहवाल मांडला. तालुका अधिवेशन, जिल्हा अधिवेशन व राज्य फेडरेशन अधिवेशन याविषयीची सविस्तर माहिती दिली.


तसेच जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड प्रियंका तावडे यांनी गेल्या तीन वर्षातील आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांसाठी केलेली आंदोलने व प्रत्येक आंदोलनातून मिळालेले ठळक यश याची माहिती अधिवेशनात दिली.
त्यानंतर पुढील तीन वर्षासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन प्रतिनिधी निवडून खालील प्रमाणे तालुका कमिटी तयार करण्यात आली व नवनियुक्त तालुका कमिटीतून तालुका पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली.
अध्यक्ष: सिमरन तांबे (नांदगाव), सचिव: अमिता राणे (कासार्डे), खजिनदार: प्रियांका तावडे (कळसुली), उपाध्यक्ष: विभावरी कांबळे (वरवडे), उपाध्यक्ष: संचिता जाधव (फोंडाघाट), सहसचिव: स्नेहल सुतार (खारेपाटण), अमिता पेंडूरकर (कनेडी) तर तालुका कमिटी सदस्य: मेघना पांचाळ (कळसुली), सिद्धी जोईल (वरवडे), साक्षी सावंत (कनेडी), वैशाली गुरव (नांदगाव), सानिका राणे (कासार्डे), माधुरी परब (फोंडाघाट), दिया ताम्हणकर (खारेपाटण).
सदर अधिवेशनामध्ये आशा व गटप्रवर्तक यांच्या खालील मागण्यांचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले:
1. आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करा.
2. आशांना किमान 26000 व गटप्रवर्तकांना किमान 28000 रुपये मासिक वेतन सुरू करा.
3. आशा व गटप्रवर्तक यांना सामाजिक सुरक्षा योजना पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी, इत्यादी सुरू करा.
4. ऑनलाइन काम करण्यासाठी आशा व गटप्रवर्तक यांना अद्यावत दर्जाचे अँड्रॉइड मोबाईल फोन द्यावेत व दरमहा 500 रुपये मोबाईल भत्ता द्यावा.
5. आशा व गटप्रवर्तकांना किमान तीन महिने प्रसुती व बालसंगोपन रजा मिळावी तसेच त्यांना इतर किरकोळ व वैद्यकीय रजा मंजूर करावेत.
(सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन सीटू संलग्न.)
ADVT –




