मुंबई : शहराच्या नागपाडा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पाण्याची टाकी साफ करताना चार सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आणि एक कामगार गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. हसीबुल शेख, राजा शेख, जलालू शेख, इमानदू शेख अशी मयत कामगारांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस व बीएमसी वॉर्डचे कर्मचारी तसेच रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहचली.
घटना घडल्यानंतर लागलीच या कामगारांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र संबंधित डॉक्टरांकडून गुदमरलेल्या 4 जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे. तर एक कामगार गंभीर असल्याचे सांगितले आहे. भूमिगत असलेल्या रिकाम्या टाकीत तयार झालेल्या विषारी वायूमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कामगार टाकीत उतरले तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही संरक्षक साधने नव्हती. त्यामुळे या दुर्घटनेस विकासकाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते
मुंबईच्या नागपाडा परिसरात असलेल्या बिस्मिल्ला स्पेस या इमारतीचे काम सूरु आहे. या इमारतीच्या तळघरात पाण्याची टाकी आहे. त्या टाकीत गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर पुरहन शेख हा कामगार गंभीर आहे. टाकीत असलेले खांब काढायला व टाकी साफ करायला हे कामगार गेले होते. मात्र तेथेच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच जणांना बाहेर काढले आणि तत्काळ जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र यातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
टाकीच्या साफसफाईसाठी कामगार आले तेव्हा बांधकाम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. टाकी १० फूट खोल व ३९० चौरस फुटांची आहे. टाकीवर ठेवलेले प्लायवूड कापून एक कामगार टाकीत उतरला. मात्र त्याची काहीच हालचाल न जाणवल्याने त्याला पाहण्यासाठी दुसरा कामगार टाकीत उतरला. त्याचीही हालचाल जाणवली नाही, म्हणून तिसरा आणि त्यापाठोपाठ चौथा कामगारही टाकीत उतरला, मात्र चौघेही बाहेर आले नाहीत. शंका आल्याने पाचवा कामगार संरक्षक पट्टा बांधून टाकीत डोकावून पाहू लागला. मात्र तो गुदमरला. त्याला त्वरित बाहेर काढण्यात आले.
याप्रकरणाची चौकशी करून जे.जे मार्ग पोलीस पुढील कारवाई करणार आहेत, अशी माहिती जे.जे मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय काटे यांनी दिली आहे.