सावंतवाडी : झाराप रेल्वे स्थानकावरून गोव्यातील वास्को येथे मोठ्या प्रमाणावर खनिज सदृश्य मातीची वाहतूक सुरू असून या प्रकारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या दहा-बारा दिवसांत तब्बल आठ ते दहा मालगाड्या भरून ही माती पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दररोज सुमारे पाचशे डंपरमधून ही माती झाराप रेल्वे स्थानकावर आणली जात असल्याने या संपूर्ण व्यवहाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
सुरुवातीला ही माती आडाळी परिसरातील कथित अवैध मायनिंगमधून येत असल्याची चर्चा होती. मात्र खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार ही खनिजमाती तळवणे-कोंडूरा परिसरातून आणली जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे “तळवणे येथे नेमके कोणत्या परवानगीवर मायनिंग सुरू आहे?” असा प्रश्न पर्यावरण प्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकरांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे या उत्खननासाठी पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल (EIA), जनसुनावणी किंवा इतर आवश्यक परवानग्यांची कोणतीही माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन कसे सुरू आहे, याबाबत नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, गुगल अर्थच्या माध्यमातून तळवणे-कोंडूरा परिसराचे निरीक्षण केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा दावा पर्यावरण अभ्यासक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
नियम व अटी धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर खनिज उत्खनन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकारात जिल्हा खनिकर्म विभाग आणि महसूल विभाग यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून संबंधित यंत्रणांची मूकसंमती असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शासनाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असतानाच पर्यावरणाचीही अपरिमित हानी होत असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
आता प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन कारवाई करणार की खनिजमातीच्या या गूढ वाहतुकीकडे दुर्लक्ष करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


