सावंतवाडी : येथील संजू परब मित्र मंडळ आणि सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे तीन दिवसीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ८ ते १० एप्रिल या कालावधीत सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यानाजवळील प्रांगणात रंगणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब आणि सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी दिली.
कोकणच्या दशावतार कलेला राजाश्रय मिळावा यासाठी सह्याद्री फाउंडेशन सातत्याने प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने या संस्थेने दशावतार नाट्य महोत्सवांचे आयोजन करून या पारंपरिक लोककलेला नवसंजीवनी देण्याचा ध्यास घेतला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात दर्जेदार दशावतार नाटकांचा समावेश असणार असून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी मिळेल.
यापूर्वी, गेल्या महिन्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या दशावतार नाट्य महोत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्या उत्साहाला कायम ठेवत आता सावंतवाडीत हा तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ ८ एप्रिल रोजी ‘वाळवेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या प्रयोगाने होणार आहे. त्यानंतर ९ एप्रिल रोजी ‘बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य प्रयोग’ आणि १० एप्रिल रोजी ‘ पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा प्रयोग’ सादर होणार आहे.
तरी, कोकणातील या पारंपरिक लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे सचिव प्रताप परब यांनी केले आहे.
आभारी आहे.
ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


