सावंतवाडी : मध्यप्रदेश मधील महू ही युद्ध्यांची जन्मभूमी म्हटली जाते. मात्र त्याच भूमीत शस्त्रे, दारुगोळा तयार केला जातो. अशा महू शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी युद्धाच्या शस्त्राने नव्हे तर लेखणीच्या एका टोकाने देशात परिवर्तन घडवून आणले. म्हणूनच आंबेडकर अनुयायांनी मनुस्मृति, संविधान, आणि बुद्ध धर्म यांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. वाचन केले तरचं शीलवान बनाल, असा मौलिक विचार सुधाकर बौद्ध (बेळगाव) यांनी येथे व्यक्त केला. श्री. बौद्ध सावंतवाडी येथील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीने समाज मंदिर सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणूनबोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर होत्या. यावेळी विचारपीठावर नायब तहसीलदार दिपाली वाघमारे, नगरपालिकेचे लेखापाल प्रसाद बटवाले, समितीचे उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, तथास्तु मॉलचे विनायक कौन्दियाळ, सामाजिक कार्यकर्ते नारायण आरोंदेकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, संतोष जाधव, मंगेश कदम, तिळाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महान नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण पंचशील म्हणून अभिवादन करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलामार्फत मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना कल्पवृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री. बौद्ध यांनी ‘भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्षे’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य जरी 15 ऑगस्ट 1947 ला मिळाले असले तरीही संविधानाने तेच स्वातंत्र्य 26 जानेवारी 1950 रोजी मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगात पुस्तकांसाठी घर बांधणारे आणि पुस्तकावर सर्वात जास्त प्रेम करणारे बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असूनही त्यांनी मनुस्मृतीचे दहन का केले?, हा इतिहास समजून घेण्यासाठी प्रत्येकाने मनुस्मृतीचा अभ्यास करावा, असेही त्यांनी आवाहन केले. समतेसाठी धर्मशासन कसे नष्ट केले?, याचा इतिहास सांगून संविधानाने कसे स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित केली हे त्यांनी स्पष्ट केले व मराठा समाजालाही आरक्षण बाबासाहेबांनी कसे मिळवून दिले हेही स्पष्ट केले. बाबासाहेबांच्या विविध पुतळ्यांचा अर्थ त्यांनी सांगून संविधान हातात घेणारा पुतळा म्हणजे ज्ञानी बना, हात उंचावणारा पुतळा म्हणजे शासनकर्ते बना, अशाप्रकारे आपणाला बाबासाहेबांनी संदेश दिला आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नायब तहसीलदार दिपाली वाघमारे यांनी बाबासाहेबांचा जयंती उत्सव मर्यादित न ठेवता त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी राज्य शासननाच्या साहित्य व सांस्कृतिक महामंडळावर अशासकीय सदस्य म्हणून निवड झालेले कवी विठ्ठल कदम तसेच कृषी विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झालेल्या कांता जाधव व सातार्डा येथील धनश्री जाधव या मुलीने आईचे निधन होऊनही प्रथम प्राधान्य परीक्षेला देऊन त्यानंतर आईवर अंत्यसंस्कार केल्याने मुलीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात.
यावेळी पंचशील महिला समूह सरमळे, एकता महिला समूह मळगाव, सिद्धार्थ ग्रुप नेमळे, महिला समूह निरवडे, रमाई कलाविष्कार मडुरा या समूह गीत स्पर्धेतील विजेत्या क्रमांकाला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच रक्तदात्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना मीनाक्षी तेंडुलकर यांनी डॉ. बाबासाहेबांचा प्रवास कथन करून महिलांना, कामगारांना व सर्वच वंचित घटक यांना मिळणाऱ्या विविध सवलती या बाबासाहेबांची देणगी असल्याचे सांगितले. तसेच बाबासाहेबांचे कार्य हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून बाबासाहेबांची दृष्टी ही विशाल होती. त्यांनी कधीही जात, पंथ न बघता गरज ओळखूनच आरक्षण दिले असल्याचे सांगून त्यांनी बाबासाहेबांचे कार्य हे सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील जाधव यांनी केले. शेवटी उपाध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी आभार मानले.
दरम्यान, दुपारी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित “होय मी राजगृहातील रमाई बोलते.!” हा एकपात्री प्रयोग सादर केला. त्यानंतर सायंकाळी उशिरा संपूर्ण बाजारपेठेतून भव्य दिव्य भिम रॅली उत्साहात काढण्यात आली. याला तालुक्यातील मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता आणि मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
ADVT –


