सावंतवाडी : गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावचा वीज प्रश्न उचलून धरण्यात आला होता. बांदा ते आरोस गावात मडुरा, पाडलोस आदी गावांतील जंगलमय भागातून जाणारी विद्युत वाहिनी सार्वजनिक बांधकामच्या रस्त्याच्या कडेने न्यावी अथवा मळेवाड येथून आरोस गावासाठी वेगळी जोडणी द्यावी, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेकडून करण्यात आली होती. अखेर वीज ग्राहक संघटनेच्या मागणीला यश येऊन महावितरणने आरोससह दांडेली, पाडलोस आदी गावासाठी बांदा ते आरोस अशी रस्त्याच्या कडेने विद्युत लाईन जोडणीला सुरुवात केली असून खांबांची उभारणी होऊन वीज वाहिन्या जोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात आठ आठ दिवस अंधारात राहणारा आरोस गाव आता तरी उजेडात येईल अशी आशा निर्माण झाली आहे.
वीज ग्राहक संघटनेचे तत्कालीन जिल्हा सचिव निखिल नाईक, आताचे जिल्हा सचिव दीपक पटेकर दोघेही आरोस गावचे सुपुत्र असल्याने केवळ जिल्ह्यातील निवेदनांमध्येच नव्हे तर मुंबई येथे दिलेल्या प्रत्येक निवेदनांमध्ये आरोस गावचा वीज प्रश्न हिरहिरीने मांडला होता. आरोस सरपंच शंकर नाईक यांनी देखील कुडाळ येथील कार्यकारी अभियंता कार्यालयातील भेटी दरम्यान उपस्थित राहून वीज समस्या सोडविण्यासाठी वीज ग्राहक संघटनेच्या चर्चेत सहभाग घेतला होता. वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून अधीक्षक अभियंता श्री.साळुंखे यांच्याकडे वारंवार आरोसचा प्रश्न मांडला गेला. सावंतवाडीचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता श्री.चव्हाण व सध्याचे उपकार्यकारी अभियंता श्री शैलेश राक्षे यांनी देखील आरोसचा वीज प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते आणि पाळले देखील. त्यामुळे तिन्ही अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत.
अशाचप्रकारे ओटवणे गावचा कमी दाबाने पुरवठा होत असलेला वीज प्रश्न देखील मार्गी लागणार असून संघटनेच्या प्रयत्नातून इन्सुली ते ओटवणे अशी तिलारी कालव्याच्या बाजूने नवीन विद्युत वाहिनी मंजूर झाली असून लवकरच ते काम सुरू करण्यात येणार आहे. वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वात लांबीचा असलेला आंब्रड फिडर प्रश्न देखील सुटला असून लवकरच मळगाव निरवडे येथील सबस्टेशन उभारणीसाठी प्रलंबित असलेल्या जागेचा प्रश्न ऐरणीवर घेऊन पुन्हा एकदा सबस्टेशन उभारणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना स्थापन झाल्यापासून गेली अडीज वर्षे सातत्याने जिल्ह्यातील विविध भागांतील वीज समस्या सुटण्यासाठी लढा देत आहे. जिल्ह्यातील वीज समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या तसेच व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य आणि वीज ग्राहकांनी आंदोलने, मोर्चा, उपोषण असे मार्ग अवलंबले. प्रत्येक गावातील समस्या सोडविण्यासाठी शेकडो अर्ज महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये दिले गेले. वीज ग्राहक संघटनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा समन्वयक ॲड नंदन वेंगुर्लेकर आदींनी जिल्ह्यातील प्रश्न घेऊन रत्नागिरी येथील विभागीय कार्यालय, कोल्हापूर कार्यालय आणि मग थेट मुंबई बांद्रा येथील प्रतापगड, महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री.पाठक साहेब यांचे कार्यालय येथे धडक देत जिल्ह्यातील प्रश्नांचा विचार करण्यास महावितरणला भाग पाडले. सद्य स्थितीत प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक ॲड नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव दीपक पटेकर, उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, यांच्या सह वीज ग्राहक संघटना पदाधिकारी,सदस्य आणि व्यापारी संघाचे पदाधिकारी वीज समस्या मार्गी लावण्यासाठी झटत आहेत. वीज ग्राहक संघटनेच्या लढ्याला हळूहळू का होईना महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील जास्तीतजास्त समस्या मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे.
ADVT –



