कणकवली : साहित्यिक आणि विज्ञानवादी नारळीकर समजून घेतले तर ती डॉ.जयंत नारळीकर यांना योग्य श्रद्धांजली ठरेल. जगण्याची इमारत उभी करताना प्रत्येक वीट तपासून घ्यायला हवी. त्यासाठी विज्ञानाची माहिती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे गरजेचे आहे.
उत्तम विद्येच्या गाभ्यात जे असते ते विज्ञानात असते! स्वतःचे वागणे तपासत जाणे म्हणजे विज्ञान असते, हा विचार डॉ. जयंत नारळीकर यांनी आपल्या जीवनात जोपासला असे प्रतिपादन कणकवलीतील उत्तम वाचक प्रसाद घाणेकर यांनी जयंत नारळीकर यांना गोपुरी आश्रमाच्या वतीने श्रद्धांजली वाहताना केले.
डॉ. जयंत नारळीकर यांचे 20 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, त्यानिमित्ताने गोपुरी आश्रमाच्या वतीने आज डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती.
विज्ञानवादी नारळीकर या विषयावर नारळीकरांच्या आठवणी सांगताना शिरगाव येथील डॉ. राजेंद्र चव्हाण म्हणाले की आपल्यासमोर जे घडते आहे ते आपल्या मनाला पटायला हवे, हा सर्वसाधारण माणसाच्या जगण्याचा कणा आहे. सद्य परिस्थिती गंभीर आहे. जगण्याचा अर्थ लागत नाही आहे. आज अंधश्रद्धा वाढत आहे. याकरिता समाज आणि विज्ञाना यातील दरी कमी करण्याची आवश्यकता आहे. विज्ञान समाजाभिमुख करणे हीच खरी डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली ठरेल, कारण याच विचारांनी नारळीकर यांनी आपल्या आयुष्यात खगोल शास्त्रात संशोधन केले व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला. विज्ञानाला प्रश्न सुटत नाहीत तर नवे प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांचा सामना मानवाला करावा लागतो. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य त्यांनी दिलेल्या वाङ्मयाच्या माध्यमातून समजून घेणे गरजेचे असेही प्रतिपादन डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी नारळीकर यांना श्रद्धांजली वाहताना केले.
गोपुरी आश्रमाच्या कै. गणपतराव सावंत बहुउद्देशीय प्रशिक्षण संकुलात ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी अभिवादन सभेचा समारोप व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी गोपुरी आश्रमाचे संचालक युयुस्थू आर्ते व धनंजय सावंत यांनीही विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विनायक (बाळू) मेस्त्री यांनी केले. या श्रद्धांजली अभिवादन सभेला कणकवली व मालवण परिसरातून विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी झाले होते.
साहित्यिक आणि विज्ञानवादी नारळीकर समजून घेतले तर डॉ. जयंत नारळीकर यांना योग्य श्रद्धांजली ठरेल ! ; गोपुरी आश्रमात डॉ. नारळीकरांना अभिवादन !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


