शिरोडा : शिरोडा भाजी मार्केटमध्ये सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून शिरोडा बाजारपेठेमधील सर्व कचरा भाजी मार्केट या ठिकाणी टाकला जात असल्याने शिरोडा भाजी मार्केट डम्पिंग ग्राउंड बनले आहे .स्थानिक नागरिकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो आहे. हा कचरा कुजल्यामुळे टायफाईड, अतिसार ,कावीळ ,हिवताप, विषमज्वर आधी साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आरोग्य विभाग साथीचे आजार रोखण्यासाठी अलर्ट मोडवर असताना शिरोडा गावात मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे.
शिरोडा बाजारपेठेतील भाजी मार्केट व मच्छी मार्केट ही ग्रामपंचायतच्या मालकीची असून ग्रामपंचायत या दोन्ही मार्केट लाखो रुपयांच्या लिलावाद्वारे ठेकेदारांना देत असते मात्र ग्रामपंचायत प्रशासन किंवा ठेकेदार या भाजी मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची साफसफाई तसेच जंतुनाशक फवारणी करीत नाही .उलट या भाजी मार्केटमध्ये कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड तयार केले असून भाजी मार्केटमध्ये सर्वत्र कचरा असल्याने पावसाळ्यात कचरा कुजून दुर्गंधी पसरली आहे. या कुजलेल्या कचऱ्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे .या साथीच्या रोगांचा प्रसार माशा किंवा तत्सम कीटकांमार्फत भाजी आदि पदार्थ तसेच मार्केट मधील हॉटेल मधील खाद्यपदार्थांवर होणार आहे याचा परिणाम बाजारपेठेतील नागरिकांच्या आरोग्यावर होणार असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा आरोग्य धोक्यात आलेले आहे ग्रामपंचायत प्रशासनाने भाजी मार्केटमधील कचरा लवकरात लवकर न उचलल्या भाजी मार्केटमधील नागरिक जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आदींची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या निवारण करण्यासाठी दाद मागणार आहेत.
या साचलेल्या कचऱ्याबद्दल ग्रामपंचायतकडे विचारणा केली असता कचरा भरून नेणारी गाडी नादुरुस्त असल्याचे कारण सांगण्यात येते. मात्र ही कचरा गाडी गेले तीन ते चार महिने नादुरुस्त असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुरुस्त करण्यात येत नाही आहे, याबद्दल नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.