नवी दिल्ली : भारत सरकारने 5 वर्षांपूर्वी चीनचे शॉर्ट-व्हिडिओ अॅप टिकटॉकवर बंदी घातली होती. मात्र आता टिकटॉक पुन्हा एकदा भारतात परतणार असल्याचे बोलले जात आहे. काही युजर्सने टिकटॉकची वेबसाइट ओपन होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर टिकटॉक भारतात परतणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. टिकटॉकची वेबसाईट लॉग इन करता येत आहे, मात्र हे अॅप अद्याप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध नाही. तसेच टिकटॉकची मूळ कंपनी बायटेन्सने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
टिकटॉकची वेबसाइट होतेय ओपन –
काही युजर्सने टिकटॉकची वेबसाइट उघडल्याचा दावा केला आहे. मात्र काही लोकांना लॉग इन करताना अडचण येत आहे. लॉग इन केल्यास होमपेज उघडत आहे, मात्र त्यानंतर पुढे कोणतीही माहिती समोर येत नाही. त्यामुळे ही वेबसाइट अद्याप भारतात पूर्णपणे सुरू झालेली नाही, मात्र तरीही याबाबत सोशल मीडियावर बातम्या प्रसारित होताना दिसत आहेत.
टिकटॉकवर बंदी का घातली?
भारत सरकारने जून 2020 मध्ये टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. याच ShareIt, Mi व्हिडिओ कॉल, क्लब फॅक्टरी आणि कॅम स्कॅनर या अॅप्सचाही समावेश होता. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी धोका असल्याचा हवाला देत सरकारने ही कारवाई केली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे अॅप्स ‘भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी हानिकारक’ होते असं स्पष्टीकरण दिले होते. तसेच गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला होता, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता.
भारत-चीन संबंध सुधारण्यास सुरुवात –
भारत-चीन यांच्यातील संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. सीमा वाद सोडवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये २४ फेऱ्या झाल्या आहेत. याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. सीमेवरील तणाव कमी झाला असून भारताकडून चीनला जाणाऱ्या विमानांची घोषणाही करण्यात आली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांवर टॅरिफ लावल्यामुळे संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक देखील होण्याची शक्यता आहे.
टिकटॉकचे पुनरागमन होणार? –
टिकटॉकचे भारतात 20 कोटींहून अधिक युजर्स होते. मात्र उद्याप टिकटॉकच्या पुनरागमनाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र वेबसाइट सुरु होत असल्याचे चाहत्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे.


