- रूपेश पाटील
सावंतवाडी : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज पाच दिवस पूर्ण झाले असून मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. निद्रिस्त शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने मराठा समाजबांधव प्रचंड नाराज झाले आहेत. ह्याच अनुषंगाने आज मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी सिंधुदुर्गची टीम मराठा रवाना झाली आहे. या टीमचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी करीत असून त्यांच्यासोबत निवडक मराठा बांधव मुंबईसाठी रवाना झाले आहेत.
दरम्यान उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आरक्षण मिळेपर्यंत समाज मागे हटणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही आणि पुढील दिवसांत संघर्ष अधिक तीव्र केला जाणार आहे.

मराठा समाजाची सहनशीलता आता संपत आली आहे. शासनाने वेळकाढूपणा केला तर आंदोलन ज्वालामुखीसारखे उसळेल, असा सूर कार्यकर्त्यांतून उमटत आहे. सिंधुदुर्गातून रवाना होणारी ही पहिली मराठा टीम समाजाच्या हक्कासाठी निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


