कोल्हापूर: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांचे आपले पत्ते एक-एक करुन उघड करायला सुरुवात केली आहे. भाजपचे नेते समरजीत घाटगे हे मंगळवारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी शरद पवार कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. पुढील चार दिवस शरद पवार यांचा मुक्काम कोल्हापूरमध्येच असेल. त्यामुळे सध्या शरद पवार यांचा मुक्काम असलेल्या पंचशील हॉटेलवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
आज सकाळीच शरद पवार यांची भेट घेण्यासाठी महायुतीमधील दोन बडे नेते पंचशील हॉटेलवर दाखल झाले. काहीवेळापूर्वीच अजितदादा गटाचे के.पी. पाटील पंचशील हॉटेलवर पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ ए.वाय. पाटील हेदेखील हॉटेलमध्ये पोहोचले. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही नेते अजित पवार गटात होते. मात्र, या दोघांनी आता विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याची तयारी सुरु केली आहे.
के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील या दोघांनाही राधानगरी भुदरगड विधानसभा मतदरासंघातून निवडणूक लढवायची आहे. या मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत. महायुतीच्या जागावाटपच्या सूत्रानुसार ही जागा पुन्हा शिंदे गटाच्याच वाट्याला जाऊ शकते. त्यामुळे आता ए.वाय. पाटील आणि के.पी. पाटील यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
यापैकी के.पी. पाटील यांनी मविआतील तिन्ही पक्षांकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र, मविआच्या जागावाटपात राधानगरी-भुदरगड हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाची संभाव्य उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील दोघेही प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची शरद पवारांसोबतची भेट महत्त्वाची मानली जात आहे. हे दोन्ही नेते परस्परांचे कट्टर राजकीय वैरी आहेत. हे दोघेही जवळपास एकाचवेळी शरद पवार यांना भेटण्यासाठी पंचशील हॉटेलवर दाखल झाले आहेत. त्यामुळे शरद पवार या दोन्ही नेत्यांशी काय बोलणार, हे पाहावे लागेल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने राजकीय गणित जमवण्यासाठी शरद पवार हे के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील यांच्यात समेट घडवून आणणार का, याकडेही साऱ्यांच्या नजरा लागल्या आहे.