सावंतवाडी : गांजा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला स्थानिक पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. जावेद पीरसाब शेख (वय ३८, रा. मोरडोंगरी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ३० ते ४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, मोरडोंगरी येथील जावेद शेख हा आपल्या घराच्या अंगणात, पाण्याच्या टाकीजवळ सायंकाळी ६ च्या सुमारास गांजा विक्री करण्यासाठी थांबलेला आहे, अशी गोपनीय माहिती पोलीस विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक खंदरकर, हवालदार प्रवीण वालावलकर, राऊत आणि मंगेश शिंगाडे यांच्यासह एका विशेष पथकाने तातडीने कारवाईची योजना आखली.
पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणावर सापळा रचला. खात्री झाल्यावर, पथकाने आरोपी जावेद शेख याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. तसेच, त्याच्या घराचा परिसर आणि घराचीही कसून झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान, आरोपीजवळ सुमारे ३० ते ४० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.
गांजा हा अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार प्रतिबंधित असल्यामुळे, पोलिसांनी तातडीने पंचनामा करून जप्त केलेला गांजा आणि आरोपी जावेद शेख याला पोलीस ठाण्यात आणले. आरोपी जावेद पीरसाब शेख याच्या विरोधात ‘अंमली पदार्थ विरोधी कायदा’ च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे समजते.
या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना मोठा धक्का बसला असून, पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थांच्या विरोधात मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


