सावंतवाडी : सद्या सावंतवाडी शहरात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून अपक्ष उमेदवार आणि माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. मतदारांनी केवळ पैशांच्या तात्पुरत्या आमिषाला बळी न पडता, शहराच्या दीर्घकालीन विकासाचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. “निवडणुकीत १० हजार रुपये स्वीकारून दिवसाला अवघ्या ५ रुपयांना विकले जाऊ नका, तर स्वतःची खरी किंमत ओळखा आणि पाच वर्षांच्या भविष्याचा विचार करून मतदान करा,” असा रोखठोक सल्ला कोरगावकर यांनी मतदारांना दिला आहे.
’मेणबत्ती’ हे चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आपल्या प्रचारदौऱ्यात मतदारांशी थेट संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून इथल्या महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. शहरातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे, भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण करणे आणि महिलांना आत्मनिर्भर बनवणे या उद्देशानेच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. माझ्या विरोधात असलेले उमेदवार हे यापूर्वी साधे नगरसेवक सुद्धा नव्हते, मात्र माझ्याकडे प्रशासकीय कामाचा आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी मतदारांनी मला संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. त्या स्पष्ट शब्दांत म्हणाल्या की, मी भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी केलेली नाही. ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ हे सूत्र घेऊन मी स्वतंत्रपणे लढत आहे. त्यामुळे जनता कोणत्याही अफवांना बळी पडणार नाही आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत सौ. ऐश्वर्या कोरगावकर तसेच त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


