सावंतवाडी : सावंतवाडी येथील आपल्यासारख्या जीवाभावाच्या आणि सुज्ञ जनतेने मला चार वेळा आशीर्वाद दिलाय. आता देखील तसाच आशीर्वाद शिवसेनेच्या २१ जणांना द्या, सावंतवाडी शहर यापुढेही अधिकाधिक विकसित होण्यासाठी आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले. हल्ली निवडणुकीत आमिष दाखवून पराभूत करण्याचे काम इथे सुरू आहे. मात्र, अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असेही ते म्हणाले.
सावंतवाडी शहरातील शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ४ च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. निता सावंत – कविटकर, प्रभाग ४ चे उमेदवार अॅड. सायली दुभाषी, प्रसाद नाईक, बकरूद्दीन पडवेकर, आकीब पडवेकर, इलियास आगा, याकूब पडवेकर, जहूर खान, शाबाज आगा आदींसह शिवसैनिक पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, सध्याच्या आजारपणामुळे मला जास्त फिरता येत नाही, याचा गैरफायदा घेऊन सावंतवाडीच्या मतदारांमध्ये वेगवेगळे गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, आमचं संपूर्ण पॅनेल निवडणुकीत उभं आहे. मला जसा आशीर्वाद दिला, तसाच आशीर्वाद शिवसेनेच्या सर्व २१ उमेदवारांना द्या.!, असेही श्री. केसरकर म्हणाले.
सावंतवाडी शहरातील भाजी मंडई, अंडरग्राउंड पार्किंग, पर्यटन केंद्र, सुसज्ज कॉम्प्लेक्स आणि मटण मार्केट उभी राहत आहेत. २४ तास पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ५७ कोटींची नळपाणी योजना मंजूर होऊन तिचे काम सुरू आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केलं.
प्रभाग चार मधील जनतेची सेवा करण्यासाठी सायली दुभाषी, प्रसाद नाईक यांच्यासह नगराध्यक्षांना विजयी करा, असे आवाहन देखील आमदार दीपक केसरकर यांनी केले.


