सिंधुदुर्गनगरी : तब्बल ३५ वर्षापूर्वी तत्कालीन मंत्री स्व. एस्. एन् देसाई यांनी जिल्ह्यातील भूमीपुत्रांना उद्योगांच्या माध्यमातून रोजगार मिळावा तसेच छोट्या मोठ्या नव उद्योजकांना आपले उद्योग उभारता यावे या उद्देशाने सुमारे २७८ हेक्टरमध्ये कुडाळ औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. या ओद्योगिक वसाहतीत साधारणपणे नवशेहून जास्त भूखंडाचे वाटप झाले. मात्र त्यापैकी तीनशेच्या आसपास उद्योग सुरु आहेत. राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणात टिकून राहायाचे असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून काही आवश्यक सुविधा देणे गरजेचे आहे. सुरळीत विद्युत पुरवठा ही अत्यावश्यक बाब असून अशा मुलभूत प्रश्नावरं प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज आहे. यासाठी आज कुडाळ औद्योगिक वसाहतीचे शिष्टमंडळ जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची सदिच्छा भेटले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या प्रलंबित समस्यांबाबत प्राधान्याने सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, ज्येष्ठ सल्लागार आनंद बांदिवडेकर, सहकार्यवाह कुणाल वरसकर,सदस्य संजीव प्रभू, राजन नाईक, मुश्ताक शेख आदि उपस्थित होते.