देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये बांधकाम विभाग मुख्य कार्यकारी अभियंता यांची बनावट सही करून ६ लाख ७६ हजारापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ५ आरोपीपैकी फरार संशयित ठेकेदार अभियंता ओमकार नंदकुमार पडते (रा. कुडाळ) याला हायकोर्टाच्या सर्किट बेंचने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने ॲड. कौस्तुभ मराठे, ॲड. मिहिर मोंडकर, ॲड. गौरव पडते यांनी युक्तिवाद केला.
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांना जानेवारी २०२६ मधे त्यांच्या सहीचे बनावटीकरण करून विविध सार्वजनिक कामांची देयके व प्रस्ताव सादर केले गेले होते व त्याआधारे थेट सरकारी तिजोरीतून ६ लाखापेक्षा जास्त रक्कम संशयिताच्या बँक खात्यात वर्ग झाले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर थेट कार्यकारी अभियंत्यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशनमधे संशयित ठेकेदार ओमकार पाताडे, ओंकार पडते, मोहन केळुसकर, लक्ष्मण राऊळ व मंदार दामोदर या संशयितावर गुन्हा दाखल केला होता. सिंधदुर्गनगरी पोलिसानी बीएनएस कायदा कलम ३१८, ३३८, ३४० सारखी गंभीर कलमे लावून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या प्रकरणातले सर्व संशयित गुन्हा दाखल होताच फरार झाले होते. पालकमंत्री नितेश राणे यांनीही या प्रकरणामागील “गॉड फादर” शोधला जाईल, असे सांगितले होते.
दरम्यान, फरार संशयितापैकी ओमकार पाताडे, ओंकार पडते, मोहन केळुसकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन फेटाळला गेला होता. तथापि २० जुलै २०२६ रोजी बॉम्बे हायकोर्टच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने यातील संशयित ओमकार पडते (रा. कुडाळ) याला पहिला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात उर्वरित संशयितानाही अटकपूर्व जामीन मिळतो का? याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.



