सावंतवाडी : निगुडे येथील अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचाराच्या प्रकरणावरून महिला ग्रामस्थ आक्रमक झाल्या असून, संबंधित व्यक्तीच्या नावावर असलेल्या इमारतीतील दुकान कायमस्वरूपी सीलबंद करून संबंधित इमारत निर्लेखित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी महिला ग्रामस्थांच्या वतीने सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनाद्वारे संबंधित दुकान कायमस्वरूपी सीलबंद करून इमारत निर्लेखित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न झाल्यास शिवसेना महिला आघाडीतर्फे सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल, असा ठाम इशारा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
अल्पवयीन मुलीशी संबंधित या संवेदनशील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिला ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाकडे आपली भूमिका मांडली आहे. या प्रकरणात योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून प्रशासनाने मागणीबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
यावेळी मौजे निगुडे येथील सौ. भाग्यलक्ष्मी गोपाळ मोरजकर यांच्यासह अन्य महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.
आता प्रशासन या निवेदनाची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि पुढील कोणती कार्यवाही करते, याकडे निगुडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



