कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात दिनांक १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि आंतरविद्याशाखीय अशा चार स्वतंत्र विभागात शोधनिबंध सादर होणार असून प्राचीन विभागाच्या अध्यक्षपदी सदाशिव टेटविलकर, ठाणे, मध्ययुगीन विभागाच्या अध्यक्षपदी डॉ. किरण जाधव, अहिल्या नगर, आधुनिक विभागाच्या अध्यक्षपदी डॉ. दीपक पाटील , दुबई आणि आंतरविद्याशाखीय विभाग सत्राध्यक्षा म्हणून डॉ. लक्ष्मी साळवी यांची निवड करण्यात आली आहे.
सदाशिव टेटविलकर हे प्राचीन भारतीय वास्तूकला, मूर्तीशास्त्र कलेचे अभ्यासक असून कोकण इतिहास परिषदेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. दुर्गयात्री ,विखुरल्या इतिहास खुणा, दुर्ग लिपी दीव,दमन व गोव्याची महाराष्ट्रातील वीरगळ, गावगाडा प्राचीन ते अर्वाचीन, राजधानी रायगड या महत्वपूर्ण शोधग्रंथाचे त्यांनी लेखन केले असून प्रतिष्ठित अशा वि.गो. खोबरेकर इतिहास संशोधक पुरस्काराने सन्मानित आहेत.
डॉ. किरण जाधव हेअगस्ती कला व वाणिज्य आणि दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून ,मराठ्यांचा इतिहास , प्रबोधनयुगाची वाटचाल ,मराठ्यांचा सामाजिक व आर्थिक इतिहास हे त्यांचे मौलिक ग्रंथ प्रकाशित आहेत.आदिलशाही आणि निजामशाही यावर काहीं लघू संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन मासिकातून त्यांचे २८ शोध निबंध प्रकाशित असून त्यांना पीएच.डी. साठी केलेल्या संशोधन अहवालास इतिहासकार वा.सि.बेंद्रे पुरस्कार सुवर्णपदक मिळाले आहे.
तसेच डॉ.दीपक पाटील हे दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील प्रसिद्ध अशा अमिटी युनिव्हर्सिटी मध्ये
इतिहास विभागात प्राध्यापक असून ते वास्तुविशारद तसेच नगररचनाकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
ते इतिहासाचे सखोल अभ्यासक व संशोधक असून भारतीय वास्तुकला, वास्तुशास्त्र, भारतीय व अरब सांस्कृतिक तसेच राजकीय इतिहासाचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.
त्यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत अनेक शोध निबंध प्रकाशित केली आहेत. संशोधन क्षेत्रात त्यांनी तीन महत्वपूर्ण पेटंट्स मिळवले आहेत.
आंतरविद्याशाखीय शोधनिबंध सत्राच्या अध्यक्षा डॉ. लक्ष्मी साळवी या चळवळीतील कार्यकर्त्या असून मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
इतिहास, आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रणाली तसेच वंचितांचे इतिहास लेखन या अभ्यास प्रवाहाच्या त्या प्रमुख अभ्यासक असून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा व परिषदेतील त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवरील फोर्ड फाउंडेशन फेलोशिपच्या पहिला पन्नासात निवड झालेली होती. महिलांच्या प्रश्नाबाबत त्या संवेदनशील असून अनेक सामाजिक स्तरांवर त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असून अनेक सामाजिक क्षेत्रात त्या हिरारीने भाग घेत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम तसेच उत्तर भारतातील दलित चळवळ या विषयात त्यांचा विशेष हातखंड आहे.
*४०० शोध निबंध सादर होणार*
अशाप्रकारे कणकवली महाविद्यालयात प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील अधिवेशनात सहभागी होण्याची पर्वणी अभ्यासक, प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार असून सलग दोन दिवस एकूण चार विभागात स्वतंत्रपणे १६ सत्रात नाविन्यपूर्ण संशोधनाचे सुमारे ४०० शोध निबंध सादर करणार होणार आहेत.
या राष्ट्रीय अधिवेशनात प्राध्यापक, अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि शोध निबंध पाठवावेत असे आवाहन मुख्य आयोजक तथा कणकवली महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, इतिहास विभाग प्रमुख तथा या राष्ट्रीय अधिवेशन आयोजन समिती चे स्थानिक सचिव डॉ. सोमनाथ कदम तसेच प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर ,डॉ. एस.टी. दिसले, डॉ. बी. एल. राठोड यांनी केले आहे.


