मुंबई : पुण्यातील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने थेट प्रश्न विचारला आहे. महिन्याभरापासून विरोधक हाच मुद्दा उपस्थित करत असताना, आता हायकोर्टानेही सरकारी वकिलांना पार्थ पवारांवर गुन्हा का नाही, अशी विचारणा केली आहे. अमेडिया कंपनीने पुणे जिल्ह्यातील कोरेगाव पार्कमधील ४० एकर सरकारी जमीन १८०० कोटी बाजारभाव असताना, केवळ ३०० कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे. या कंपनीचे ९९ टक्के समभाग पार्थ पवार यांच्याकडे आहेत, तर त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्याकडे एक टक्का समभाग आहेत. या प्रकरणात जमीन लिहून देणाऱ्या शितल तेजवानींना अटक झाली असून, दिग्विजय पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे, मात्र पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी याबाबत सरकारी वकिलांना विचारणा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणालाही वाचवणार नाही, दोषींवर कारवाई होईल, असे स्पष्ट केले आहे.


