संस्कृतीची जोपासना, हीच आमची आराधना! ; प्रजासत्ताक दिनी सर्वोदय नगरात एकोप्याचा, कलेचा आणि संस्कृतीचा उत्सव!

सावंतवाडी : प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र पर्वावर सर्वोदयनगर रहिवासी संघाने आयोजित केलेला स्नेहसंमेलन सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो संस्कृती, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत अनुभव होता.
दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुरू झालेला हा सोहळा रात्री उशिरापर्यंत आनंद, हास्य, टाळ्यांचा गजर आणि माणुसकीच्या उबदार स्पर्शाने न्हाऊन निघाला. या उत्सवाचे उद्घाटन नव-नियुक्त उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नव-नियुक्त नगरसेवक अजय गोंदावळे, सौ. नीलम नाईक, सौ. सुकन्या टोपले, तसेच माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक आदि मान्यवरांची उपस्थिती लाभली.

ज्येष्ठ नागरिकांच्या करकमलांनी मान्यवरांचा शाल–श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आणि त्या क्षणी पिढ्यांमधील ऋणानुबंध अधिकच घट्ट झाले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सर्वोदय नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव सौ. मेघना राऊळ, महिला संघाच्या अध्यक्षा सौ. दिशा कामत, महिला सचिव सौ. शरयू बारदेस्कर, तसेच  गुरुदत्त कामत, संभाजी नाईक, विद्याधर तावडे, तानाजी पालव, ॲड. रुजुल पाटणकर, श्री. कालकुंद्रिकर सर, श्री. काका परब, श्री. गुंडू साटेलकर आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाची मांडणी पाहता एकोप्याचा सुगंध दरवळत होता. यावेळी बोलताना ॲड. अनिल निरवडेकर यांनी
“अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे केवळ कार्यक्रम होत नाहीत, तर समाज घडतो. सर्वोदय नगर हे सावंतवाडीसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे,” असे गौरवोद्गार काढत पुढील काळात सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.


या स्नेहसंमेलनात महिला संघटनेच्या सक्रिय सहभागाने कार्यक्रमाला नवे बळ मिळाले. स्त्रीशक्ती आज सामाजिक जीवनात पुरुषांच्या बरोबरीने नव्हे, तर कधी कधी पुढेच असल्याचे या उपक्रमातून ठळकपणे जाणवले.
यानंतर रंगमंचावर अवतरले बालकलाकारांचे निरागस विश्व.
फॅन्सी ड्रेस, वक्तृत्व, नृत्य अशा विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या स्पर्धांचे परीक्षण प्रा. कराड सर, सौ. सुरेखा नाईक, गोठोस्कर सर, राणे सर, सौ. अमृता साटेलकर, बुवा सर आणि योगीश कुलकर्णी यांनी केले. विजेत्यांना सन्मानचिन्हे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचा आणखी एक हृद्य टप्पा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची गाण्यांची मैफल व कराओके.

अनुभवांनी समृद्ध स्वरांनी उपस्थितांच्या मनात आठवणींचे मोरपिस फुलवले आणि क्षणभर काळ थांबल्यासारखा भास झाला. कार्यक्रमाच्या छायाचित्रणाची धुरा निनाद नाईक व सबिना यांच्या टीमने समर्थपणे सांभाळली.
सौ. मिलन पेडणेकर व सौ. मेघना राऊळ यांच्या प्रभावी, ओघवत्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत द्विगुणित झाली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. सिद्धेश नेरूरकर यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
शेवटी, स्नेहभोजनाच्या निमित्ताने सर्व रहिवासी एका पंगतीत एकत्र आले, संवाद वाढला, नाती घट्ट झाली आणि “आपण सारे एक आहोत” ही भावना अधिकच दृढ झाली.
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्याने सर्वोदय नगरातील प्रत्येक रहिवाशाने या सोहळ्याला यशस्वी केले.
संस्कृतीची ज्योत तेवत ठेवणारा, एकोप्याचा हा उत्सव सर्वोदय नगरच्या इतिहासात एक सुंदर स्मरणरूप ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles