पुणे : पुण्यातील वरसगाव धरणातील भिंतीवर काल (मंगळवारी) मोठी मगर आढळली आहे. वरसगाव धरणाच्या भिंतीवर मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही मगर दिसली आहे.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास धरणावरील सुरक्षा मंडळाचे कर्मचारी, राहूल जाधव आणि कुणाल बोराडे पाण्याची पातळी पाहण्यासाठी भिंतीवरून जात असताना त्यांना अंधारात समोर हालचाल झाल्याचे दिसून आले. त्यांनी विजेरीच्या उजेडात पाहिले असता त्यांना मोठी मगर असल्याचे दिसून आले. ती मगर धरणाच्या भिंती लगत असलेल्या सुरक्षा चौकीच्या दिशेने येत होती. त्यांनी मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात तिला पाहिले त्यानंतर मगरीने दिशा बदलली आणि ती पुढे धरणाच्या भिंतीवरून जाऊ लागली.
वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व रेस्क्यू टीम रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचली. ते मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्याची पातळी पाहण्यासाठी धरणाच्या भिंतीवर जावे लागते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे..


