सावंतवाडीकरांना वाऱ्यावर सोडून नगरसेवक गेले कुठे? ; आशिष सुभेदारांचा प्रशासनावर घणाघात!

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात सध्या रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, गटारे आणि स्वच्छतेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले असताना तब्बल पाच वर्षांनंतर जनतेने निवडून दिलेले नगरसेवक नेमके कुठे आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील प्रत्येक प्रभागाची अवस्था बिकट झाली असून लोकप्रतिनिधी मात्र जनतेपासून दूर गेल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी पत्रकारांशी बोलताना नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. “जनतेचा सेवक हा आपल्या प्रभागातील प्रत्येक समस्या स्वतःच्या घरातील प्रश्न समजून सोडवणारा असावा. मात्र आज सावंतवाडीत रस्त्यांची खोदाई, पाणीपुरवठ्याच्या समस्या, वाढता डासप्रादुर्भाव आणि अंधारात बुडालेले रस्ते याकडे कुणाचेही लक्ष नाही. नगरसेवक आपल्या प्रभागात दिसत नसल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत,” असे सुभेदार यांनी सांगितले.

मुख्याधिकारी विनायक औंधकर आणि नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी जनतेसमोर येऊन नगरसेवक नेमके कुठे आहेत याचे उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, खासकीलवाडा आणि न्यू खासकीलवाडा प्रभागातील रखडलेल्या विकासकामांबाबत आवाज उठवल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाल्याचा दावा सुभेदार यांनी केला आहे. त्यांच्या इशाऱ्यानंतर प्रभागातील अनेक विकासकामांना गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सुभेदार यांच्या मते, सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमधील गटबाजीमुळे अनेक विकासकामे रखडली होती. काही कामे टेंडर व वर्कऑर्डर होऊनही पालिकेतूनच ती सुरू न करण्याचे आदेश दिल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अर्धवट गटार बांधकाम, निकृष्ट दर्जाची कामे, स्ट्रीट लाईटची अपूर्ण कामे, झाडी तोडणीचा अभाव आणि कचऱ्याची दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

विशेष म्हणजे, चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या खोदाईमुळे ज्युस्टीननगर कमानीसमोर शनिवारी पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पाणीटंचाईच्या काळात अशी घटना घडणे हे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचा आरोप सुभेदार यांनी केला. प्रशासन आणि ठेकेदारांनी याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा संतप्त नागरिकांसह नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

“जनतेच्या प्रश्नांवर राजकारण नको, विकास हवा!” नगरसेवकांनी गटबाजी सोडून रस्त्यावर उतरावे, अन्यथा जनता योग्य वेळी उत्तर देईल,” असा घणाघाती इशारा आशिष सुभेदार यांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles