हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश; आंबा विमा कालावधी ३१ मेपर्यंत वाढवला! : मनीष दळवी.

सिंधुदुर्गच्या बागायतदारांसाठी दिलासादायक निर्णय!

सिंधुनगरी  : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांच्या हिताचे दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये नारळ व सुपारी या पिकांचा प्रथमच विमा योजनेत समावेश करण्यात आला असून, आंबा पीक विम्याचा कालावधी १५ मेवरून ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

यापूर्वी या योजनेत केवळ आंबा, काजू आणि केळी या तीन पिकांनाच विमा संरक्षण मिळत होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड असलेल्या नारळ व सुपारी या महत्त्वाच्या पिकांचा विमा योजनेत समावेश नसल्याने किनारपट्टी भागातील अनेक बागायतदार वंचित राहत होते. बदलत्या हवामानाचा या पिकांवर मोठा परिणाम होत असल्याने त्यांनाही विमा संरक्षण मिळावे, अशी सातत्याने मागणी होत होती.

तसेच, गेल्या तीन-चार वर्षांत १५ मेनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आंबा पीक विम्याची अंतिम मुदत वाढविण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.

या दोन्ही मागण्यांची दखल घेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला होता. पालकमंत्र्यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सन २०२६-२७ च्या फळ पीक विमा धोरणात हे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

सुधारित निर्णय

➡️ नवीन पिकांचा समावेश : आंबा, काजू व केळीबरोबरच आता नारळ आणि सुपारी या पिकांचाही हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे.

➡️ आंबा विमा कालावधी वाढ : आंबा पिकासाठी विमा घेण्याची अंतिम मुदत १५ मेवरून ३१ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

या निर्णयामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू, नारळ आणि सुपारी उत्पादक बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार असून, बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत आपल्या फळबागा विमा संरक्षणाखाली आणाव्यात, असे आवाहन मनीष दळवी यांनी केले आहे. तसेच या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल त्यांनी पालकमंत्री मा. नितेश राणे आणि राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles