✍️ मोहन जाधव.
सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून शेरले दुकानवाडी ते कापई (जुना) पूल या रस्त्याची डागडुजी केली; मात्र कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याच्या साईड पट्टीसाठी टाकण्यात आलेली माती थेट रस्त्यावरच पसरल्याने वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
याशिवाय अनेक वर्षे या मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. लाखो रुपये खर्च करूनही रस्ता अद्याप सुरक्षित आणि सुकर न झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

ब्रिटिशकालीन शेकडो वर्षे जुना कापई पूल उंचीने कमी असल्यामुळे पावसाळ्यात वारंवार पुलावर पाणी येत असे. परिणामी बांदा–शिरोडा मार्गावरील वाहतूक अनेकदा ठप्प होत होती. नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर या ठिकाणी पर्यायी नवीन पूल उभारण्यात आला. नवीन पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर जुन्या पुलाकडे आणि त्या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले.
दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या जुन्या रस्त्याची लाखो रुपये खर्चून डागडुजी केली. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्यावरील झाडे-झुडपे हटविण्यात आली नाहीत. त्यातच साईड पट्टीसाठी टाकलेली माती रस्त्यावरच राहिल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सामाजिक कार्यकर्ते महेश उर्फ पप्पू खोबरेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळा शेर्लेकर आणि विक्रांत नेवगी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरील माती हटवून झाडे-झुडपे कापावीत आणि हा मार्ग सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.



