सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 (पाणलोट विकास कार्यक्रम) अंतर्गत झालेल्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे.

आमदार जठार यांनी २ जुलै २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात ठोंबरेवाडीतील पक्के व मातीचे बांधारे, शेततळे, शेतरस्ते आणि वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी झाल्याचा उल्लेख केला आहे. अनेक कामे निकृष्ट दर्जाची असून, काही ठिकाणी मंजूर कामांऐवजी वेगळीच कामे झाल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पत्रात विशेषतः काही बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवण्याची क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच संबंधित कामांवर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये स्थानिक पाणलोट समितीच्या शिफारशी आणि नियमानुसार प्रक्रिया न पाळता लाभार्थी निवड झाल्याचाही आरोप पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच झालेल्या चौकशीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.
या पत्रामुळे दोडामार्ग तालुक्यातील पाणलोट विकास कामांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, शासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



