सावंतवाडी : तालुक्यातील सातुळी-बावळाट ग्रामपंचायतीतील विकासकामांच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत उपसरपंच स्वप्निल सुभाष परब यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विकासकामांची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, चिलेवाडी येथे स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामासाठी मंजूर अंदाजपत्रकात तब्बल १८ विद्युत खांब (पोल) प्रस्तावित असताना प्रत्यक्षात केवळ ५ ते ६ पोल उभारण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर स्ट्रीट लाईट अद्याप कार्यान्वितही झालेली नसतानाही संबंधित ठेकेदाराला बिलाची रक्कम अदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कामाबाबत मासिक सभेत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तसेच उपसरपंच आणि इतर सदस्यांना विश्वासात न घेता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय, बावळाट–चिलेवाडी रस्ता डांबरीकरण व खडीकरणाच्या कामातही कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित फाईलमध्ये जोडलेली छायाचित्रे ही त्या रस्त्याची नसून दुसऱ्याच रस्त्याची असल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. तसेच मोजमाप पुस्तिका (एमबी) फाईलमध्ये उपलब्ध नसतानाही बिल मंजूर करून ठेकेदाराच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
उपसरपंच परब यांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्रामपंचायतीतील विकासकामे, मोजमाप पुस्तिका, बिले तसेच आर्थिक व्यवहारांबाबत मासिक सभेत चर्चा केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, मासिक सभांच्या नियोजनाबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. नियमानुसार सभेचा अजेंडा किमान सात दिवस अगोदर देणे अपेक्षित असताना तो केवळ एक-दोन दिवस आधी व्हॉट्सॲपवर पाठविला जात असल्याने सदस्यांना तयारी व नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, सदस्यांच्या गैरहजेरीमुळे काही मासिक सभा तहकूब झाल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि नियमानुसार चालविण्यात यावा, अशी मागणी उपसरपंच स्वप्निल सुभाष परब यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, या तक्रारीतील सर्व आरोप हे तक्रारदार उपसरपंच यांनी केलेले असून संबंधित सरपंच, ग्रामपंचायत प्रशासन अथवा अन्य संबंधित पक्षांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.



