लोकांच्या जीवाशी खेळ थांबवा!” ; उमाकांत वारंग यांची गढूळ पाणी घेऊनच नगरपरिषदेत धडक! ; माजी उपनगराध्यक्ष आक्रमक, मोर्चाचा इशारा!

सावंतवाडी : शहरातील नागरिकांच्या नळातून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी सोमवारी नगरपरिषद गाठत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. हातात गढूळ पाण्याची बाटली घेऊनच ते मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आले होते. मात्र मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांनी प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांची भेट घेत संतप्त शब्दांत प्रशासनाला फैलावर घेतले.
“लोकांच्या जीवाशी खेळ का करता? या दूषित पाण्यामुळे नागरिक, लहान मुले आजारी पडली तर त्याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल करत वारंग यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. अन्यथा नागरिकांसह नगरपरिषदेवर भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावर प्रशासकीय अधिकारी वैभवकुमार अंधारे यांनी पाईपलाईनमध्ये गळती झाल्यामुळे पाणी गढूळ झाल्याचे सांगितले. संबंधित दुरुस्ती आजच पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मात्र या उत्तरावर समाधान न मानता वारंग यांनी, “आश्वासन नको, नागरिकांना स्वच्छ पाणी द्या. लोकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा दिला.
यावेळी अशोक पवार यांनीही महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या कामामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर संबंधित कंपनीकडून भरपाई करून घेतली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
या प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सत्यजित धारणकर, अशोक पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जर तात्काळ स्वच्छ पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर नागरिकांच्या रोषाला नगरपरिषदेला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles