Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

लाल मातीचे ऋण फेडण्यासाठी अधिकारी बना – प्रा. रुपेश पाटील. ; उभादंडा हायस्कूल येथे विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव समारंभात व्याख्यान संपन्न.

वेंगुर्ला : आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत राज्यात तब्बल एक तपभर अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र असे असले तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तसेच तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या कोकणातील मुलांची टक्केवारी चिंताजनक आहे. आपली मुलं अधिकारी झाली तर त्यांना येथील जटील समस्या लवकर समजतील आणि त्या सोडविण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करतील. म्हणून लाल मातीचे ऋण फेडण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकारी व्हावे, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी उभा दांडा येथे व्यक्त केले.

न्यू एज्युकेशन सोसायटी उभादांडा संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा या प्रशालेत ‘विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव’ समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा परीक्षा व्याख्याते प्रा. रुपेश पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन व समारंभाचे अध्यक्ष वीरेंद्र कामत – आडारकर, जि. प. माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, संस्थेचे सेक्रेटरी रमेश विठ्ठल नरसुले, संस्था उपाध्यक्ष व सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, सदस्य राधाकृष्ण मांजरेकर, निलेश मांजरेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्च २०२४ च्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान प्रमुख व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी ‘स्पर्धा परीक्षा – काळाची गरज’ या विषयावर आपले विचार पुष्प गुंफले.
ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालक अतिशय सजग असून आपल्या पाल्यांनी शिकून मोठे व्हावे, ही माफक अपेक्षा प्रत्येक आई-बाबांची आहे. त्यासाठी अहोरात्र झिजण्याची त्यांची तयारी आह. मात्र याचे भान विद्यार्थ्यांनी बाळगणे गरजेचे आहे. आपल्या जिल्ह्यातील जटील समस्या सोडवायच्या असतील तर येथील अधिकारी ह्याच लाल मातीतले पाहिजे. तरचं त्यांना इथल्या व्यथा आणि वेदना कळतील. असे सांगत रुपेश पाटील यांनी विविध स्पर्धा परीक्षा आणि त्याची तयारी कशी करावी, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना आपल्याला अनेकदा अडचणी येत असतात. मात्र त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण अभ्यास करून उपाय योजिले पाहिजेत. आपण समाज कल्याण सभापती असताना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था केली. त्यासाठी अर्ज मागवले, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ आठ विद्यार्थ्यांनी आपल्या या योजनेला प्रतिसाद दिला. याची खंत हृदयात आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आगामी काळातील आव्हानांसाठी सज्ज होण्याचे सांगितले. माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्था चेअरमन वीरेंद्र कामत – आडारकर यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, उभादांडा पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपल्या स्तरावरून जे जे सहकार्य लागेल, ते सर्व सहकार्य आपण करायला तयार आहोत. फक्त विद्यार्थ्यांनी शिकण्याची आणि यशस्वी होण्याची योग्य तयारी करावी.

यावेळी उभादांडा विद्यालयातील मार्च २०२४ च्या शालांत परीक्षेत प्रथम पाच क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले श्रुती श्रीधर शेवडे, दीपेश जयराम वराडकर, योजना रावजी कुर्ले, दीपक राजाराम साळगावकर, गंधाली अनंत केळुसकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शिक्षकांचाही झाला सन्मान –
दरम्यान यावेळी शाळेच्या प्रगतीत मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यात शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, अश्विनी भिसे, वर्षा मोहिते, मनाली कुबल, दीपक बोडेकर व वैभव खानोलकर या शिक्षकांचा तसेच लिपिक अजित केरकर व शिक्षकेतर कर्मचारी दिलीप गोठस्कर यांचा भेटवस्तू, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

विद्यार्थिनी श्रुती शेवडेचे दातृत्व-
उभादांडा विद्यालयातून इयत्ता दहावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली गुणवंत विद्यार्थिनी श्रुती शेवडे हिने मागील तीन वर्षात अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत घवघवीत बक्षिसे जिंकली होती. या बक्षिसांमध्ये रोख रक्कमांचाही समावेश होता. दरम्यान तिने आपल्या गुरूजणांचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला मिळालेल्या बक्षीसांच्या रकमेतून सर्व शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. श्रुती शेवडे व तिचे पालक श्रीधर शेवडे व सौभाग्यवती शेवडे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे व दातृत्वाचे उपस्थित सर्व मान्यवर व पालकांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांनी केले. खुमासदार सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव रमेश नरसुले यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles