सावंतवाडी : अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी सायली सखाराम सावंत हिने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा बहुमान मिळविला आहे. यापूर्वीही सायलीने अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे.


सायली शहरातील पंचम खेमराज महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत आहे. तिला तिचे मार्गदर्शक गुरु सौरभ वारंग यांनी सातत्याने मार्गदर्शन केले आहे. सायलीचे आई-वडील यांचेही सायलीला सातत्याने प्रोत्साहन मिळत आहे. तिचे वडील सखाराम सावंत माजी सैनिक आहेत. सायली मौजे दाणोली गावाची सुकन्या असून दाणोली ग्रामस्थांच्या वतीने नुकताच तिचा सन्मान करण्यात आला.


