सावंतवाडी : ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ अशा शब्दात आपल्या भक्तांना धीर देणाऱ्या स्वामी समर्थांची लीला अगाध आहे, त्यांची कृपादृष्टी कधी व कोणावर होईल हे कोणालाही सांगता येणार नाही. याचाच प्रत्यय न्हावेली येथील कालवणकर कुटुंबीयांना आला. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे नि:सीम भक्त असलेल्या राजन कालवणकर यांचे कुटुंबिय आपण नवीन घेतलेली गाडी घेऊन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले असताना तेथील पुरोहितांनी त्यांना वटवृक्षाच्या ‘पादुका’ प्रसाद म्हणून दिल्या. घरी नेऊन या पादुकांचे पूजन करा असा आदेश त्यांनी दिल्याने कालवणकर कुटुंबीय भारावून गेले. लवकरच या पादुकांची प्रतिष्ठापना त्यांच्या निवासस्थानी केली जाणार आहे.
राजन कालवणकर यांनी काही दिवसांपूर्वी नवीन क्रेटा गाडी खरेदी केली. गाडी घेतल्यानंतर त्यांचा मुलगा प्रथमेश कालवणकर यांच्यासह त्यांचे जावई चेतन गावडे, राजेश्वरी कालवणकर, निकिता परब, निखिल परब, संजय नाईक, अरुण गावडे, राजश्री गावडे, रोशन गावडे, चैताली गावडे, तनया मोचेमाडकर व साहिल नाईक असे अन्य कुटुंबीय व नातेवाईक मिळून कुलदेवता तुळजाभवानी तसेच खंडोबा व अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी रवाना झाले. सावंतवाडीतून निघाल्यानंतर बाळूमामा कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी, प्रति बालाजी, एक मुखी दत्त मंदिर, जेजुरी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तुळजाभवानी असे दर्शन घेत ९ फेब्रुवारी रोजी अक्कलकोट येथे पोहोचले.
अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात संध्याकाळची महाआरती झाल्यावर त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सोबत नेलेल्या फुलांसह नवीन गाडीची चावी देखील स्वामींच्या चरणावर वाहण्यास तेथील पुरोहितांना विनंती केली. यावेळी पुरोहितांनी त्यांना थोडावेळ थांबण्यास सांगून प्रथमेश याच्या हातात स्वामींच्या वटवृक्षाच्या पादुका ठेवल्या. प्रथमेश व त्याचे सर्व कुटुंबीय क्षणभर भारावून गेले. स्वामींची लीला अगाध आहे असे म्हणून आनंदाश्रूंनी पाणावलेल्या डोळ्यांनी स्वामींचे मनोमन आभार मानले.
त्यानंतर अक्कलकोट येथील खंडोबा मंदिर तसेच स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराजांचे मंदिर, वाडा तसेच बाळप्पा महाराजांचा मठ श्री गुरु मंदिर येथील स्वामींच्या चरणांचे दर्शन घेऊन ते नरसोबावाडीच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर ज्योतिबाचे दर्शन घेऊन ते घरी परतले.
अक्कलकोट येथे स्वामींच्या मंदिरात प्रसाद स्वरूपात लाभलेल्या या वटवृक्षाच्या पादुकांचे कालवणकर कुटुंबीयांनी घरी मोठ्या थाटामाटात व भक्ती भावाने स्वागत केले. कालवणकर यांचे जावई चेतन गावडे यांनी चांदीचे वेस्टन करून दिले. याच दरम्यान घावनळे येथील मठातील गावस यांनी त्यांना स्वामींची मूर्ती भेट दिली. स्वामींची ही अखंड कृपा आहे असे समजून धन्य पावलेल्या राजन कालवणकर यांनी वटवृक्षाच्या पादुका व मूर्तीची २० फेब्रुवारी रोजी प्रतिष्ठापना करायचा संकल्प केला असून यावेळी स्वामी भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.