मुंबई/कणकवली : कवी अजय कांडर यांची कविता कधी एकांगी विचार मांडत नाही. त्यामुळे त्यांच्या आवानओल काव्यसंग्रहातील कवितेवरी ‘कळत्या न कळत्या वयात’ हे नाटक वस्तुस्थिती दर्शक भाष्य करते. या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग होत राहिला पाहिजे असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. मीना गोखले यांनी व्यक्त केले.
मुंबई दीप तारांगण निर्मित दीपा सावंत खोत यांची निर्मिती असलेले अजय कांडर लिखित आणि रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘कळत्या न कळत्या वयात’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबई रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला. नाटकानंतर झालेल्या चर्चेत बोलताना प्रा. डॉ. गोखले यांनी या नाटकाचे जसे अधिकाधिक प्रयोग होत जातील तसे ते नाटक अधिकाधिक सफाईदार प्रभावीपणे सादर होत जाईल, असेही निरीक्षणही नोंदवले.
‘कळत्या न कळत्या वयात’ नाटकाच्या या पहिल्याच प्रयोगाला मुंबईतील अनेक मान्यवर रसिक उपस्थित होते. यात प्रा. मीना गोखले यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले, लोकप्रिय नाट्य दिग्दर्शक मंगेश सातपुते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ. कुंदा प्रमिला निलकंठ, कॉ. अनिल सावंत, कॉ. सुबोध मोरे, कोकणातील ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण, अभिनेते दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, शैक्षणिक कार्यकर्ते अजित शिर्के आदींसह अनेक प्रतिष्ठित नाट्य रसिक उपस्थित होते.
यावेळी कुंदा प्रमिला निलकंठ म्हणाल्या, कळत्या न कळत्या वयात नाटक बघताना फार मजा आली. फार प्रभावीपणे ते सादर झालेच परंतु या नाटकाचे लेखन विचार करायला भाग पाडणारे आहे. माऊथ पब्लिसिटीतून नाटक सगळीकडे पोहोचविणे ही आम्हा प्रेक्षकांची जबाबदारी अधिक आहे.

(छायाचित्र – ‘कळत्या न कळत्या वयात’ नाटकातील एक क्षण)
मंगेश सातपुते म्हणाले एखादं नाटक उभं करणे हे आताच्या काळातली मोठी कठीण गोष्ट आहे. अशावेळी एक दोन तास नाट्य कलाकृती बघून त्यावर कधीही चुकीची प्रतिक्रिया दिली जाऊ नये. ‘कळत्या न कळत्या वयात’ या नाटकाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल.
श्रीनिवास नार्वेकर म्हणाले, दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी नाटक उत्तम सादर केले आहे.या नाटकाचे लेखक अजय कांडर हे माझे जवळचे मित्र असल्यामुळे त्यांचा तीस-पस्तीस वर्षाचा लेखन प्रवास मी जवळून पाहिला आहे. या नाटकातील सर्वच कलाकारांनी अतिशय समर्थपणे आपापली व्यक्तिरेखा सादर केल्यामुळे या नाटकाचा प्रभाव प्रेक्षकावर राहतो.
डॉ.राजेंद्र चव्हाण म्हणाले अजय कांडर यांचा आवानओल काव्यसंग्रह मी वाचला आहे. त्यातील प्रत्येक कवितांवर मी चित्रे रेखाटली आहेत.अशा कवितांचे नाट्यरुप पहाताना छान वाटले.सर्वच कलाकारानी उत्तम अभिनय केला असून ते प्रभावीपणे नाटक सादर करतात.
अजय कांडर म्हणाले, 2007 साली लिहिलेले हे नाटक आहे.आज ते अधिक काळाशी समांतर जात आहे. माणूस जात, धर्म, देव यात जेवढा अधिक भ्रमिष्ट होत जाईल, तेवढे हे नाटक रसिकांना अंतर्मुख करत जाईल. यावेळी निर्मात्या दीपा सावंत, अभिनेता निलेश भेरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. पहिल्याच नाट्यप्रयोगाला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


