वेंगुर्ला : रेडी येथील किल्ले यशवंतगडावर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व गट विकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या उपस्थितीत यशवंतगड रेडी येथे व्यसनमुक्तीचे सूचना फलक उभारून ‘ व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा’ शुभारंभ झाला.
या उपक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, नशामुक्त भारत अभियान टीम, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस यंत्रणा,वाहतूक पोलीस यंत्रणा, दुर्ग मावळा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी, पूर्ण प्राथमिक शाळा शिरोडा खर्डेवाडी, माऊली विद्या मंदिर रेडी, जिल्हा तंबाखू नियंत्रण विभाग, सर्व पोलीस पाटील, आरोग्य व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, महिला बचतगट, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व शिवप्रेमी इत्यादी संस्थांनी आपला सहभाग दिला.

याप्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक व सचिव अमोल मडामे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच रेडीचे सरपंच रामसिंग राणे, रेडी उपसरपंच आनंद भिसे, माजी जिल्हा सभापती अजित सावंत, त्याचबरोबर आरवली गावचे सरपंच समीर कांबळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमली पदार्थ विरोधी मोहिमेला गडचिरोलीतील डॉ अभय बंग यांच्या मुक्तीपथ सारखे जनआंदोलनाचे स्वरूप देण्याचे उद्दिष्ट असून आजचा कार्यक्रम म्हणजे त्यासाठी उचललेले एक पाऊल होय ! असे सांगितले.
त्यानंतर नशाबंदी मंडळाचे मासिक कल्याणयात्रा- व्यसनमुक्तीच्या गाथा चे प्रकाशन गट विकास अधिकारी वासुदेव नाईक व पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केले. शिरोडा खर्डेवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.
या कार्यक्रमांमध्ये व्यसनमुक्ती वरील पोस्टर आणि ऐतिहासिक शस्त्रे, इतिहासाची विविध साधने, तलवार, राज्यशस्त्र दांडपट्टा, कट्यार, जिरेटोप, वाघनखें, तिरकमान, जुनी नाणी, संदर्भ ग्रंथाचे प्रदर्शन इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते. तसेच व्यसनमुक्तीची साप सिडी या खेळाचे ही आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना सदर उपक्रमाची आवश्यकता व महत्त्व उपस्थितांना सांगितले आणि या मोहिमेत आम्ही पूर्ण ताकदीनिशी सहभागी होऊ असा शब्द दिला.
नशाबंदी मंडळाचे राज्य संघटक व सचिव अमोल मडामे यांनी शिवाजी महाराज व व्यसनमुक्ती या विषयावर आपले विचार व्यक्त करून व्यसनमुक्त गड किल्ले संवर्धन मोहिम राबविण्यामागील शिवाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि संस्कार विशद केले. दुर्गरक्षक प्रतिष्ठान चे सचिव भूषण मांजरेकर ह्यांनी यशवंतगडावर केलेल्या ह्या शुभारंभचे खरी गरज व कारणे,तसेच गडाला लागून असलेल्या व्यावसायिक बेकायदेशीर बांधकामामुळे गडावर ह्या व्यसनांची सुरुवात होण्याची भीती व शक्यता व्यक्त करुन त्या संबंधित शासकीय यंत्रणा व समस्त शिवप्रेमीनीं सजग राहून ह्या गोष्टी वेळीच रोखणे आवश्यक असल्याचे प्रखर मत मांडले.
गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी या उपक्रमात सहभागी झालो याचा मला विशेष आनंद आहे. या उपक्रमास मी खूप खूप सदिच्छा देतो, कारण या उपक्रमामुळे तरुण पिढी घडणार आहे.पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणाची सुरुवात व्यसनमुक्तीपर कवितेने केली. या उपक्रमाचे कौतुक केले आणि या उपक्रमास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी व्यसनांमुळे होणारे अत्याचार बलात्कार व गुन्हेगारी याचा उल्लेख करून व्यसनांपासून दूर राहणे किती आवश्यक आहे, हे सांगितले. त्यानंतर त्यांनी उपस्थित जनसमूहाला व्यसनमुक्तीची शपथ दिली.
या कार्यक्रमासाठी दुर्ग रक्षक प्रतिष्ठानचे नारायण तेंडुलकर, भूषण मांजरेकर, राजाराम चिपकर, अनसा भगत, दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे समिल नाईक, उत्कर्षा वेंगुर्लेकर, ज्ञानेश्वर राणे, रोहन राऊळ, साईप्रसाद मसगे, केशव ठाकूर, वेदांत वेंगुर्लेकर, गणेश नाईक तसेच नशाबंदी मंडळाचे अमोल मडामे, दिशा कळंबे, मिलिंद पाटील, चेतना सावंत आदी उपस्थित होते सदर अनोख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना पाताडे यांनी केले व आभार प्रदर्शन दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक यांनी केले.


