सावंतवाडी : येथील नगरपरिषद निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेनेत राडा झाल्यानंतर पोलीस ठाण्यात देखील कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या व्यक्तींकडून परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पोलिसांकडून देखील गुन्हे दाखल करण्यात येणार असून पोलिस ठाण्यात घातलेली हुज्जत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घडामोडी सुरू होत्या. रात्री ११.३० वाजता भाजपचे विशाल परब यांचे खासगी सुरक्षारक्षकांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी श्री. परब यांना शिवसेनेकडून झालेल्या आरोपांबाबत विचारलं असता त्यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, विनोद राऊळ आदी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी समोरून तक्रार केल्यास आम्हीही करू असं मत व्यक्त केले होते. दरम्यान, शिवसेनेकडून देखील तक्रार दाखल करण्यात आली असून दोन्ही पक्षांच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यात. तसेच पोलिस ठाण्यात हुज्जत घातल्याने व बेकायदेशीर जमाव केल्यान पोलिसांकडूनही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हजर होते.


