सावंतवाडी : तालुक्यातील वेर्ले गावात बंदुकीच्या गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सचिन मर्गज यांच्या मृत्यूमागे सुप्रियान डान्टस याच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे, असा खळबळजनक आरोप वेर्ले ग्रामस्थांनी केला आहे.
तसेच या प्रकरणात गावातील काही लोक राजकीय हस्तक्षेप करत असल्याचेदेखील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या गंभीर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुप्रियान डान्टस याला शनिवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली तर त्याच्याकडे असलेली बंदूक व काडतूसं जप्त करण्यात आली आहेत, असे सावंतवाडी पोलीसांकडून सांगण्यात आले.
सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले येथील जंगलात सांगेली येथील सचिन मर्गज या युवकाचा शिकारी दरम्यान गोळी बसून मृत्यू झाला होता. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या डान्टस याच्यावर काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घातपातात आणखी काही जणांचा समावेश आहे. पोलीस राजकीय दबाव आल्यामुळे अनेकांची नावे लपवत आहेत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तसेच या प्रकाराच्या मागे नेमके कोण आहेत? याच्या खोलात पोलिसांनी जावे संबंधितावर गुन्हे दाखल करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.



