मालवण : तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये फायर ॲण्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबईचे ट्रेनर संजय मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. त्यांनी ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रथमोपचार या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीकडे असावयास असणारे गुण, प्रथमोपचार करण्याचे उद्देश, बँडेजचे प्रकार व बँडेज बांधण्याच्या पद्धती, रक्त थांबवण्यासाठी जखमेवर करावयाचे प्रथमोपचार, फ्रॅक्चरचे प्रकार व फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तींना हाताळावयाच्या विविध पद्धती, त्वचा भाजल्यावर करावयाचे प्रथमोपचार, व्यक्तीला चक्कर आल्यावर किंवा बेशुद्ध पडल्यावर करावयाचे उपाय, हृदयविकाराचा झटका आल्यावर तातडीने करावयाचे उपचार व त्या व्यक्तीला सी. पी. आर. द्यावयाची पद्धती, साप, प्राणी अथवा कीटकांच्या दंशामुळे विषबाधा झाल्यास करावयाचे उपाय, विष प्रयोग झाल्यास करावयाचे उपाय, कोणतेही साधन नसताना जखमींना वाहून नेण्याच्या पद्धती इत्यादी विषयांवर मार्गदर्शक संजय मेस्त्री यांनी प्रात्यक्षिकांसह पी.पी.टी. व व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. प्रथमोपचारांचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्यांनी लागणारे साहित्य खास मुंबईहून आणले होते.
हलकेफुलके विनोद करीत त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अडीच तास मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रात्यक्षिकांमध्ये विद्यार्थी व शिक्षक ही सहभागी झाले होते. या मार्गदर्शन शिबिरामुळे ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराबद्दल सखोल माहिती मिळाली. तसेच प्रशालेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी हे शिबिर लाभदायक ठरले.
या शिबिरासाठी प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक ए.ए.शेर्लेकर, पी.के.राणे, एस.जे.सावंत, पी. आर पारकर, एस.पी.पवार, विजय नातू व शिक्षकेतर कर्मचारी आर.जे.जाधव, पी.व्ही.खोडके, एम.डी.परूळेकर हे उपस्थित होते. प्रथमोपचाराचे विना मोबदला प्रशिक्षण दिल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक संजय मेस्त्री यांचे प्रशालेच्या वतीने आभार मानले.


