जळगाव : जिल्ह्यातील नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीत 77 वर्षांच्या आजीबाईं जनाबाई रंधे या नगरसेवकपदी विजयी झाल्या आहेत. वयाच्या 77 व्या वर्षी पायात साधी चप्पलही न घालता, कडक उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या जनाबाई रंधे यांनी नगरसेवकपदी विजय मिळवला आहे.

पायात चप्पल ना हातात काठी, तरुणांना लाजवेल असा या आजीबाईंचा वयाच्या 77 व्या वर्षी देखील उत्साह आहे. या वयात जिथे अनेकजण निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात, तिथे जनाबाईंनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारून तरुणांसमोरही एक आदर्श ठेवला आहे.

जनाबाई रंधे यांचा हा विजय म्हणजे जिद्द आणि विश्वासाचा विजय असल्याचं मानलं जात आहे. आयुष्याच्या या टप्प्यावरही जनतेसाठी काहीतरी कार्य करण्याची जनाबाई यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणा ठरतेय. जनाबाई रंधे यांनी भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. नशिराबादमधल्या प्रभाग क्रमांक 7 अ मधून त्यांनी निवडणूक लढवली आणि तिथे त्या विजयी झाल्या आहेत. मतमोजणी केंद्रात विजयी झाल्याची घोषणा झाल्यावर आनंदात त्यांना अश्रू अनावर झाले. जनाबाईंनी आयुष्यात पहिल्यांदा निवडणूक लढवण्याची माहिती समोर आली आहे.
