देशातील एक जबाबदार व सन्मान्य नागरिक म्हणून जगण्यासाठी धार्मिक असणे किती महत्त्वाचे आहे ? जगामध्ये अमेरिका , जपान , विएतनाम, चीन हाँगकाँग या देशा मध्ये ६० ते ७० % लोक कोणत्याही धर्माचे पालन करीत नाहीत व त्यांना सन्मान्य नागरिक म्हणून जगण्यात कोणतीही अडचण येत नाही .
इतकेच काय चीन मध्ये ९१% , जपान ८६ % , Uk ७२ % , आस्ट्रेलिया ७० , बेल्जियम ७२ % लोक ईश्वराचे अस्तित्व देखील मानत नाहीत आणि त्यांनाही जगण्यात कोणतीही अडचण येत नाही . विशेष म्हणजे हे सर्व देश प्रगत देश आहेत .
आणि असे जर आहे तर भारत , पाकिस्तान , बांगला देश किंवा इतर इस्लामिक राष्ट्रांमध्ये धर्माचे एवढे अवडंबर का माजले आहे ? बरे जो धर्म आपण स्वतः अभ्यास करून स्वीकारलेला आहे त्याबद्दल अभिमान असायला हरकत नाही परंतु जो धर्म आपल्याला केवळ जन्माने गळ्यात पडलेला आहे त्याबद्दल फुकाचा अभिमान किती बाळगायचा याचा विचार करणे गरजेचे आहे .
मानवाची उत्क्रांती होत असताना तत्कालीन काही समाज धुरीणांना मानवप्राण्यांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी काही नियम तयार करण्याची गरज भासली असावी व त्यातूनच धर्म नावाची संकल्पना उदयास आली . परंतु जसजसा मानवप्राणी उत्क्रांत होत गेला तसे पुढे देश नावाची संकल्पना उदयास आली . आणि यासाठी संविधानाची गरज निर्माण झाली त्याप्रमाणे प्रत्येक देशाच्या घटना तयार झाल्या . आता या संविधाना प्रमाणे देशातील नागरिकांनी जगावे अशी अपेक्षा निर्माण झाली . संविधानाने नागरिकांना सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था केली . असे असताना धर्माप्रमाणे जगण्याचा अट्टाहास कां करावा ?
एखाद्या व्यक्तीला आपणास जन्माप्रमाणे मिळालेला धर्म पाळायचा नसेल तर तो धर्मविरोधी कसा ठरतो ? अलिकडे तर धर्माभिमान पराकोटीला पोहोचत आहे . वास्तविक जसजसा शिक्षणाचा प्रसार होत जाईल तसे हे धर्मवेड कमी होत जाईल असे वाटत होते परंतु ते दिवसेंदिवस वाढतच चाललेले दिसते .
हे असे कां व्हावे हा एक चिंतनाचाच नव्हे तर चिंतेचा विषय बनत चाललेला आहे.
– डॉ. ह .ना . जगताप



