१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर भांगेच्या गोळ्या आणि मद्य पाजून कारमध्ये सामूहिक अत्याचार! ; मिरा – भाईंदर हादरले, दोघांना अटक.

मुंबई : रात्रीच्या अंधारात, कमी वर्दळीच्या रस्त्यावर चारचाकी वाहनात 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मिरा-भाईंदर शहरात उघडकीस आली आहे. आरोपींनी प्रथम पीडितेला भांगेच्या गोळ्या खायला घालून आणि नंतर मद्य पाजून पूर्णपणे बेशुद्ध केले. त्यानंतर आळीपाळीने तिच्यावर क्रूर अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड परिसरात कुटुंबीयांसोबत राहणारी ही 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी 5 जानेवारीच्या रात्री तिच्या ‘मित्राच्या’ विश्वासाला बळी पडली. 21 वर्षीय सलमान खान याने तिला चारचाकी वाहनात बसवून बळजबरीने एल. आर. तिवारी कॉलेज रोड या कमी वर्दळीच्या ठिकाणी नेले. त्याच्यासोबत त्याचा 24 वर्षीय मित्र सरदारजी (सर्दारजी) देखील उपस्थित होता.

वाहनातच अमानुष अत्याचार सुरू झाला. प्रथम पीडित तरुणीला जबरदस्तीने भांगेच्या गोळ्या खायला घालण्यात आल्या. मात्र, तरीही ती पूर्णपणे बेशुद्ध न झाल्याचे पाहून आरोपींनी तिला मद्य पाजून पूर्णपणे बेहोश केले. शुद्ध हरपल्यानंतर, दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर चारचाकीतच अत्याचार केला. हा प्रकार पोक्सो कायद्यांतर्गत अत्यंत गंभीर गुन्हा ठरतो.

पीडितेच्या धैर्याने उघडकीस आले प्रकरण – या अमानवी कृत्यानंतर धैर्य एकवटून पीडित मुलीने दुसऱ्या दिवशी सकाळी घडलेला सारा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी मिरा रोड पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ हालचाली करीत बाल लैंगिक अत्याचारासह भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविला. त्यानंतर तपास करून बुधवारी दुपारी दोन्ही आरोपी सलमान खान (21) आणि सरदारजी (24) यांना अटक केली.

शहरात तीव्र संताप ; सुरक्षिततेवर प्रश्न – मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात अल्पवयीन कंत्राटी कर्मचारी मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच, आता भर रस्त्यावर घडलेला हा प्रकार शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण करीत आहे. “खरंच महिला आणि मुली शहरात सुरक्षित आहेत का ?” असा सवाल उपस्थित होत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना आणि पोलिस पेट्रोलिंगची मागणी केली जात आहे.

पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने एकदा पुन्हा समाजातील नराधमांच्या क्रौर्याला उघड करून दाखवले आहे. पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी आणि न्यायासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles