सावंतवाडी : तालुक्यातील साटेली तर्फ सातार्डा ग्रामपंचायतजवळ 23 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सागर महादेव गोवेकर (वय 32, रा. सातार्डा बांधवाडी, ता. सावंतवाडी) हा आपल्या ताब्यातील आयशर डंपर (क्र. GA-03/V-5547) निष्काळजीपणे व अतिवेगाने चालवत होता. रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने कोंडुरा दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल (क्र. MH-07/AW-0448) ला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून मोटारसायकल चालक साहिल जाधव यांना किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या आहेत.
अपघातानंतर चालकाने घटनेची माहिती न देता वाहनासह तेथून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जखमी साहिल जाधव यांना प्रथम मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बांबुळी येथे हलविण्यात आले.
या प्रकरणी जखमीचे नातेवाईक वामन सदाशिव जाधव (वय 53, रा. सोनुर्ली जाधववाडी, ता. सावंतवाडी) यांनी सातार्डा दूरक्षेत्र येथे तक्रार दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. टाकेकर हे करीत आहेत.



