सावंतवाडी : उच्च शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा गाठत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) आणि ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज यांच्या अर्थशास्त्र व वाणिज्य विभागांदरम्यान सामंजस्य करार (MOU) संपन्न झाला. हा करार केवळ औपचारिक न राहता ज्ञानविनिमय, संशोधन, कौशल्यविकास आणि शैक्षणिक सहकार्याचा मजबूत दुवा ठरेल, असे प्रतिपादन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नीलम धुरी यांनी केले.
डॉ. धुरी म्हणाल्या की, अर्थशास्त्र आणि वाणिज्य हे विषय परस्परपूरक आहेत. अर्थव्यवस्थेच्या तत्त्वज्ञानाला व्यवहारातील गती देण्याचे काम वाणिज्य करते. या करारामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवाची प्रभावी संधी उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओंकार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नीलम धुरी व सहाय्यक प्राध्यापक कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
आयक्यूएसी समन्वयक तथा वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) ज्ञानराजा चिघळीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) काशिनाथ तनंगे यांनी आभार प्रदर्शन केले. ओंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष राजनदादा पेडणेकर यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधून मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका पुजा कोचरी यांनी केले. यावेळी सहाय्यक प्राध्यापिका श्रद्धा बनसोडे, सहाय्यक प्राध्यापक गजानन कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापिका संतोषी कनगुटकर, सहाय्यक प्राध्यापक सचिन पाटील, प्रा. (डॉ.) संजीवनी पाटील, मुख्य लिपिक प्रकाश कांबळे यांच्यासह ओंकार महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून आगामी पाच वर्षांत दोन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापकांचे आदानप्रदान, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रे व कार्यशाळांचे आयोजन, अभ्यासभेटी तसेच विविध संशोधन उपक्रम संयुक्तपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.



