सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे कुंभारवाडी येथे घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. गीतेश भिवा राऊळ या तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून दीर्घकाळ चाललेल्या आजारपणाच्या असह्य वेदना आणि उपचारांच्या चिंतेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
गीतेश हा आपल्या कुटुंबासह साध्या परिस्थितीत आयुष्य जगत होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून तो कंबरेच्या गंभीर आजाराने त्रस्त होता. अलीकडेच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कुटुंबीयांना त्याच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी आशा होती; मात्र शस्त्रक्रियेनंतरही त्याला अपेक्षित आराम मिळाला नाही. पुढील शस्त्रक्रिया आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या चिंतेने तो दिवसेंदिवस मानसिकदृष्ट्या खचत चालला होता.
पहाटेच्या शांत वेळी त्याने वाडीतील दोन जिवलग मित्रांना फोन करून “मी माझ्या आयुष्याला कंटाळलो आहे… आता जगण्याची ताकद उरली नाही” असे शब्द उच्चारले. हे ऐकताच मित्रांनी जीवाच्या आकांताने त्याच्या घराकडे धाव घेतली. पण नियतीने वेगळाच खेळ खेळला होता. मित्र पोहोचेपर्यंत गीतेशने घरातच दोरीचा फास लावून आपली जीवनयात्रा संपवली होती. त्या क्षणी कुंभारवाडीवर शोककळा पसरली आणि गावभर हळहळ व्यक्त होऊ लागली.
घरातील कर्त्या तरुणाच्या अचानक जाण्याने आई-वडील, भाऊ, भावजय, दोन पुतणे व एक पुतणी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबियांच्या आक्रोशाने परिसर दुमदुमून गेला असून गावकरीही या घटनेने स्तब्ध झाले आहेत.
या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर तसेच पोलीस कर्मचारी दीपक शिंदे, निलेश मोरबाळे आदी अधिक तपास करत आहेत.
आजारपणाच्या वेदना, आर्थिक चिंता आणि मानसिक ताण यामुळे एखादे आयुष्य असे अचानक संपते, तेव्हा समाजाने एकमेकांना आधार देण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते…



