सावंतवाडी : सावंतवाडी शहरात अवैध मटका व्यवसायावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने जोरदार कारवाई करत पुन्हा एकदा जुगार माफियांना दणका दिला आहे.
शहरात फिरून मटका चिठ्ठ्या गोळा करणारा नेल्सन जॉकी लुईस (वय ४९, रा. जुनाबाजार) हा इसम चिठ्ठ्या आणि रोख रक्कम आपल्या मालकाकडे देण्यासाठी निघाला असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सालईवाडा येथे दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास ही थरारक कारवाई करण्यात आली.
या वेळी नेल्सन लुईस हा जमा केलेल्या चिठ्ठ्या व तब्बल ३१ हजार रुपयांची रोख रक्कम मालक सुनील सुरेश आडीवरेकर (वय ५१, रा. जुनाबाजार, सावंतवाडी) याला देताना रंगेहात पकडण्यात आला. या घटनेमुळे शहरात सुरु असलेल्या मटका रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई अत्यंत शिताफीने पार पाडली. PSI श्री. भोसले, ASI श्री. राठोड, तसेच हवालदार श्री. राठोड यांनी या धाडीत सक्रिय सहभाग घेतला.
दोघांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या कारवाईमुळे शहरातील अवैध धंद्यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे मटका व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, “आता पुढचा नंबर कोणाचा?” अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.



