डिजिटल मीडियाचा ऐतिहासिक महासंगम!, ४ मे रोजी पणजी येथे होणार भव्य महाअधिवेशन. ; राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांची पाहणी, तयारीला वेग.

पणजी  : डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रातील देशव्यापी महत्त्वाचा ठरणारा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा तिसरा भव्य महा अधिवेशन सोहळा येत्या ४ मे २०२६ रोजी पणजी येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जय्यत तयारीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी कला अकादमी परिसराला भेट देत आयोजनाचा आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान अधिवेशनाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक कला अकादमी येथील कार्यालयात पार पडली. बैठकीस गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, महाराष्ट्र महासचिव विकास भोसले, केंद्रीय उपाध्यक्ष महेश कुगावकर, अमोल पाटील, केंद्रीय महासचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य प्रसिद्धीप्रमुख धिरज शेळके, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर तसेच कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व स्मरणिका संपादक भाऊसाहेब फास्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजा माने यांनी अधोरेखित केले की, “गोवा येथे होणारे हे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन डिजिटल पत्रकारितेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील हजारो संपादक व पत्रकार या व्यासपीठावर एकत्र येणार असून, विचारांची देवाणघेवाण, नव्या संधींचा शोध आणि माध्यम क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांवर सखोल चर्चा होणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन केवळ औपचारिक नसून दिशादर्शक ठरेल.”


तसेच त्यांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांना आवाहन करत सांगितले की, अधिवेशनात सहभागी होण्यासाठी १५ एप्रिल २०२६ पर्यंत आपापल्या जिल्हाध्यक्षांकडे अधिकृत नोंदणी पूर्ण करावी, जेणेकरून आयोजन अधिक सुटसुटीत व भव्य पद्धतीने पार पाडता येईल.
दरम्यान, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले की, “गोवा राज्याला समृद्ध ऐतिहासिक व पत्रकारितेची परंपरा लाभली आहे. या पार्श्वभूमीवर होणारे हे अधिवेशन केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि डिजिटल पत्रकारितेच्या नव्या दिशा दाखवणारे ठरेल. देशभरातून येणाऱ्या सर्व प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आमची संपूर्ण टीम सज्ज असून, हे अधिवेशन सर्वांच्या स्मरणात राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
एकूणच, डिजिटल मीडिया क्षेत्रातील दिग्गजांचा महासंगम ठरणारे हे अधिवेशन पत्रकारिता क्षेत्राला नवी ऊर्जा, नवी दिशा आणि नवे दृष्टीकोन देणारे ठरणार असल्याची उत्सुकता सर्वत्र व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles