सिंधुदुर्गनगरी : माजी केंद्रीय मंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी आज ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला सदिच्छा भेट देत बँकेच्या उल्लेखनीय प्रगतीचा गौरव केला.
या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी संचालक गजानन गावडे, समीर सावंत, विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश बोडस, जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत, मिलिंद कुलकर्णी, संदीप कुडतरकर तसेच प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिवाकर देसाई आणि इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
बँकेने चालू आर्थिक वर्षात तब्बल ७००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार केल्याबद्दल खा. राणे यांनी विशेष समाधान व्यक्त करत अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि संपूर्ण संचालक मंडळाचे मनापासून अभिनंदन केले. ३१ मार्च २०२६ रोजीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेताना त्यांनी बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्थिर असल्याचा विश्वास व्यक्त केला.
याशिवाय, IBPS मार्फत राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने पूर्ण केल्याबद्दलही त्यांनी बँक प्रशासनाचे कौतुक केले.
“जिल्हा बँकेच्या प्रगतीसाठी माझे सहकार्य व आशीर्वाद कायम राहतील,” असे आश्वासन देत खा. राणे यांनी बँकेच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ही भरारी जिल्ह्याच्या आर्थिक बळकटीकरणाचे प्रतीक ठरत असून, सहकार क्षेत्रातील एक प्रेरणादायी यशकथा म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.



