पर्यटकांची भरधाव कार थेट धडकली काजू स्टॉलमध्ये! ; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना!

सावंतवाडी : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपास मार्गावर मळगाव सुतारवाडी सर्कल येथे आज दुपारी भीषण अपघात घडला. रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात पर्यटकांची भरधाव कार थेट रस्त्यालगतच्या काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये घुसली. या अपघातात कारमधील तीन युवक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने स्टॉल मालक त्या वेळी ठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन (मध्य प्रदेश) येथील चार युवक गोव्यात पर्यटनासाठी आले होते. हे सर्वजण मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरीला असून, होंडा अमेझ (MH 23 BH 8533 A) कारमधून गोव्याहून मुंबईकडे परतत होते. दुपारी मळगाव सुतारवाडी सर्कलजवळ पोहोचताच एक दुचाकीस्वार अचानक महामार्ग ओलांडू लागला.
त्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक मारत कार वळवली. मात्र, यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून कार प्रथम दुभाजकावर आदळली आणि उलट दिशेने फिरत थेट काजू विक्रीच्या स्टॉलमध्ये जाऊन जोरात धडकली.हा स्टॉल मळगाव पिंपळवाडी येथील मंगेश राऊळ यांच्या मालकीचा असून, अपघाताच्या वेळी ते योगायोगाने जेवणासाठी घरी गेले होते. जेवण करून परत येताना त्यांच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडला. ते त्या वेळी स्टॉलमध्ये असते, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अपघातात स्टॉलचे व साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातात जखमी झालेल्या तीन युवकांना तातडीने सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच सावंतवाडी पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मात्र, सायंकाळपर्यंत या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवली गेली नव्हती. क्षणात घडलेली ही घटना मोठ्या दुर्घटनेत बदलली असती, सुदैवाने जीवितहानी टळली, पण बेफिकीर वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहेच!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles