सावंतवाडीत बनावट नोटांचा पर्दाफाश! ; सहा जणांना अटक.

सावंतवाडी : शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत जमा झालेल्या रकमेतील २०० रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बँक व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या बनावट नोटांचा धागा थेट सांगलीपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस तपासात आढळले की, जप्त नोटांवरील सिरीयल क्रमांक सांगली येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील नोटांच्या सिरीजशी जुळणारे आहेत. या महत्त्वाच्या धाग्याच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणात
सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२), राहुल राजाराम जाधव (३३), इब्रार आदम इनामदार (४४), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०), सिद्धेश जगदीश म्हात्रे (३८, रा. मालाड, मुंबई) आणि संदीप बाळू कांबळे (३८)
या सहा जणांना सांगली येथून न्यायालयाच्या आदेशाने जेलमधून ताब्यात घेऊन सावंतवाडीत आणण्यात आले.
त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत.
दरम्यान, बनावट नोटांच्या या साखळीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून अधिक सखोल तपास सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles