✍️ विलास जंगले.
सावंतवाडी : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर गाव मौजे केसरी येथे कृषी विभागाच्या वतीने “EL NINO जागरूकता शिवार फेरी कार्यक्रम”, जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक, संवाद सेतू तसेच बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी विजय गंबरे यांनी उपस्थित शेतकरी वर्गास EL NINO मुळे उद्भवू शकणारे संभाव्य परिणाम, बदलते हवामान आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नैसर्गिक शेतीचे महत्त्व, कमी खर्चात अधिक उत्पादन आणि सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करण्याबाबत माहिती दिली.

उप कृषी अधिकारी व्ही. के. पाटील यांनी बीजप्रक्रिया, बियाणे उगवण चाचणी याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तर सहाय्यक कृषी अधिकारी टी. सी. राणे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमास केसरी गावातील सुमारे ५२ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयुक्त तांत्रिक माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.



