✍️ अभिजीत सावंत.
वेंगुर्ला : तालुक्यातील वजराट गावात निसर्गाने एक अनोखी किमया दाखवत आंबाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. येथील शेतकरी प्रताप शिवराम राणे यांच्या आंबा बागेमध्ये हापूस जातीचा दुर्मिळ असा ‘जुळा आंबा’ आढळून आला असून परिसरात या अनोख्या फळाची मोठी चर्चा रंगली आहे.
कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याची गोडी, सुगंध आणि दर्जा जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, एका देठाला नैसर्गिकरित्या जोडलेल्या दोन आंब्यांच्या स्वरूपात तयार झालेला हा जुळा आंबा पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. निसर्गाच्या कुशीत उमललेला हा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी नागरिक आणि आंबा उत्पादक उत्सुकता दाखवत आहेत.
प्रताप राणे यांच्या बागेत यंदा आंब्याचे भरघोस उत्पादन आले असून, त्यामध्ये हा जुळा आंबा विशेष आकर्षण ठरत आहे. “निसर्ग कधी, कुठे आणि कोणत्या रूपात चमत्कार घडवेल सांगता येत नाही,” अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, अशा प्रकारचे जुळे फळ अत्यंत दुर्मिळ मानले जाते. त्यामुळे हा आंबा केवळ कुतूहलाचा विषय न राहता निसर्गाच्या वैविध्यपूर्ण सौंदर्याची प्रचिती देणारा ठरला आहे. सध्या सोशल मीडियावरही या जुळ्या हापूस आंब्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, “कोकणच्या मातीतली अनोखी देणगी” अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहे.



